शपथविधीनंतर सह्य़ाद्रीवर रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठका आटोपून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मॅजेस्टिक आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरील ४२१ क्रमांकाच्या आपल्या रूमवर आले आणि नंतर काही वेळ केवळ एक कौटुंबिक सोहळा त्या खोलीने अनुभवला.. आमदार निवासाच्या त्या इमारतीनेच, याआधी कधी मुख्यमंत्र्याचा मुक्काम पाहिलेला नव्हता. ४२१ क्रमांकाची खोली तर शुक्रवारी भारावूनच गेली होती. फुलांचे गुच्छ, हारतुरे यांचा भार त्या खोलीने दिवसभर आनंदाने अंगावर वागविला.. खुद्द राज्याचे मुख्यमंत्रीच मुक्कामाला थांबल्याने मॅजेस्टिक आमदार निवासाला मलबार हिलवरील ‘वर्षां’चा तोरा आला होता.
शपथविधी, नंतर पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा, त्यानंतर सहकारी मंत्र्यांसोबतची बैठक, वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबरचा विचार विनिमय आटोपून मध्यरात्रीनंतर ते आमदार निवासातील या खोलीत परतले. मुख्यमंत्र्यांचा मुक्काम असलेल्या या खोलीला एक प्रसन्न रूप देण्यात आले होते. एका टेबलवर फुलांचे गुच्छ विराजमान होते.  
मुख्यमंत्र्यांच्या मुक्कामामुळे संपूर्ण इमारतीलाच कडेकोट बंदोबस्त आहे. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मलबार हिलवरील ‘वर्षां’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचा मुक्काम असतो. मात्र या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वास्तव्याच्या काळातील सामानाची हलवाहलव सुरू असल्याने शुक्रवारी आमदार निवासातील आपल्या खोलीतच राहणे फडणवीस यांनी पसंत केले आहे. शनिवारी मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीचा पहिला दिवस असल्याने, बाहेर पडताना त्यांनी मातोश्रींना नमस्कार केला, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि कुटुंबाच्या सदिच्छा सोबत घेऊन फडणवीस यांनी आपला दिनक्रम सुरू केला.
राष्ट्रवादी बाजूने मतदान करणार
विश्वासदर्शक ठरावावर सरकारच्या बाजूने मतदान करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.  स्थैर्याच्या मुद्दय़ावर भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने आधाची जाहीर केला होता. ठरावावर प्रत्यक्ष मतदान झाले तरी राष्ट्रवादीचे ४१ आमदार सभागृहात सरकारच्या बाजूने मतदान करतील, असे सांगण्यात आले.
मॅजेस्टिक आमदार निवासाच्या चौथ्या मजल्यावरील ४२१ क्रमांकाच्या तात्पुरत्या निवासस्थानातून देवेंद्र फडणवीस शनिवारी निघाले ते मातोश्रींचा आशीर्वाद घेऊनच. मुख्यमंत्रीपदाच्या कारभाराची प्रत्यक्ष सुरुवात शनिवारी होणार असल्याने फडणवीस यांना आशीर्वाद देताना त्यांच्या आईइतकेच सर्वच आप्तांचे मन भारावले होते.
सेनेसाठी खातेवाटप थांबले
मुंबई : शिवसेनेशी चर्चा सुरू असल्याने राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप थांबले आहे. शिवसेनेला किती व कोणती खाती द्यायची, याचा निर्णय एक-दोन दिवसांत अपेक्षित आहे. सेनेने मात्र आपल्या मागण्यांत वाढ केली असून ही चर्चा लांबल्यास सोमवापर्यंत खातेवाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.