प्रसाद रावकर, लोकसत्ता
मुंबई : दरवर्षी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाचा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी गिरगाव, दादर, जुहू आदी चौपाट्यांवर भाविक, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मुंबईकर आणि पर्यटकांची गर्दी होते. विसर्जनासाठी उभारलेला मंडप, शामियाना आणि उपस्थितांची सुरक्षा लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेन चौपाटी परिसराचा विमा उतरवावा. परिणामी, कोणतीही दुर्घटना घडल्यास मृतांच्या नातेवाईकांना वा जखमींना विम्याचे कवच लाभेल, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
येत्या १९ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव सुरू होत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईमधील गिरगाव, दादर, जुहू चौपाट्यांवर होणारा गणेश सोहळा पाहण्यासाठी केवळ मुंबईकरच नव्हे तर आसपासच्या शहरांतील नागरिकही येत असतात. इतकेच नव्हे तर देश-विदेशातील अनेक पर्यटकही या सोहळ्यास हजेरी लावतात. मोठ्या संख्येने भाविक गणेश विसर्जन मिरवणुकांमधून चौपाट्यांवर दाखल होतात. तसेच मोठ्या संख्येने राजकीय नेते मंडळी, उच्चपदस्थ अधिकारीही या दिवशी चौपाट्यांना भेट देतात. त्याचबरोबर दीड दिवस, पाचवा दिवस, सातव्या दिवशी चौपाट्यांवर गणेश विसर्जनासाठी प्रचंड गर्दी होते.
आणखी वाचा-फेरीवाला धोरणाचा अर्थ कुठेही दुकान थाटावे असा होत नाही, उच्च न्यायालयाने बजावले
विसर्जन सोहळ्यानिमित्त मुंबई महानगरपालिकेतर्फे विविध सुविधा उपलब्ध करण्यात येतात. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी चौपाट्यांवर जातीने उपस्थित राहून भाविकांना मदत करीत असतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी चौपाट्यांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असतो. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस आणि अन्य यंत्रणांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने चौपाट्यांवरील नियोजनात सहभागी होतात. त्याचबरोबर समुद्रात किनाऱ्यालगत जीवरक्षकही तैनात असतात.
विसर्जन सोहळ्यानिमित्त होणाऱ्या गर्दीत घातपात, नैसर्गिक आपत्ती, अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मिरवणुकांसोबत येणारे भाविक, विसर्जन सोहळा पाहण्यासाठी येणारे नागरिक, पर्यटक, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी, पोलीस, जीवरक्षक आदींची सुरक्षितता लक्षात घेऊन मुख्य विसर्जन स्थळांचा विमा काढावा. त्यामुळे या सर्वांना विम्याचे कवच लाभेल, अशी मागणी, बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अक्बाल सिंह चहल यांना पत्र पाठवून केली आहे.
गणेशोत्सव अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी तातडीने या मागणीचा विचार करावा, असे ॲड. दहिबावकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.