मुंबई: मालाडच्या उड्डाणपूलावर झालेल्या दुचाकी अपघातात २२ वर्षीय महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. रविवारी पहाटे हा अपघात घडला. डंपरचालकाने अचानक वळण घेतल्याने दुचाकी डंपरला धडकून ही दुर्घटना घडली. मालाड पोलीस फरार डंपरचालकाचा शोध घेत आहेत.

निखिल कद्रे (२२) हा तरूण गोरेगावच्या आरे कॉलनी येथे रहात होता. त्याचा मित्र सुमित खैरनार (२२) हा गोरेगाव पूर्वेच्या मुकुंदनगरचा रहिवासी आहे. दोघेही महाविद्यालयाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होते. कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार रात्री ते दोघे जेवणासाठी बाहेर गेले होते. रविवारी पहाटे सुमारे दिडच्या सुमारास ते मालाडहून गोरेगावकडे परतत होते. निखिल कद्रे हा दुचाकी चालवत होता तर सुमित त्याच्या मागे बसला होता.

ते पश्चित द्रुतगती महामार्गावरून निघाले होते. मालाडच्या पठाणवाडी उड्डाणपूलावरून ते जात होेते. त्यांच्या पुढे एक डंपर होता. मात्र डंपरचालकाने अचानक ब्रेक लावून उजवीकडे वळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दुचाकी थेट डंपरला धडकली आणि दोघे दुचाकीवरून फेकले गेले. अपघातानंतर दोघांना तातडीने जोगेश्वरी (पूर्व) येथील ट्रॉमा केअर रुग्णालायात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी निखिलला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. जखमी सुमीतवर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर डंपरचालक आपली गाडी सोडून घटनास्थळावरून पळून गेला. पोलिसांनी डंपर जप्त केला असून मालकाचा शोध घेऊन चालकाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कुरार पोलिसांनी चालकाविरुद्ध निष्काळजीपणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याचा सुरू आहे, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही चित्रण पोलिसांकडून तपासले जात आहे.