‘बेस्ट’च्या महिला विशेष बससेवेत नियोजनाअभावी गोंधळ; महिला प्रवासी मिळत नसल्याने पुरुष प्रवाशांनाही प्रवेश

निलेश अडसूळ, मुंबई</strong>

महिलांच्या सुरक्षा आणि सोयीच्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ‘एनसीपीए’दरम्यान सुरू करण्यात आलेली ‘तेजस्विनी’ बस योजना पहिल्याच आठवडय़ात फोल ठरताना दिसत आहे. एकीकडे, अनेक महिला प्रवाशांना या बससेवेबाबत कल्पना नसल्याचे दिसत आहे तर दुसरीकडे, महिला प्रवासी कमी असल्याने ‘बेस्ट’कडून पुरुष प्रवाशांनाही या बसमध्ये प्रवेश दिला जात आहे.

महिलांच्या सुरक्षा आणि सोयीसाठी राज्य सरकारने बेस्ट प्रशासनाला ‘तेजस्विनी’ या विशेष गाडय़ा देऊ  के ल्या आहेत. या योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते एनसीपीए या दरम्यान ‘विशेष १’ क्रमांकाची बस गुरुवारपासून सुरू करण्यात आली. सध्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सहा बस दाखल झाल्या असून गर्दीच्या वेळेत दर दहा मिनिटांनी या बसची फे री सुरू आहे. परंतु गर्दीच्या वेळा वगळता या बसचा प्रवास सामान्य बस प्रमाणेच सुरू  असल्याने महिला चार आणि पुरुष चाळीस अशी ‘तेजस्विनी’ची एकू ण अवस्था आहे.

अनेकदा गर्दीच्या वेळेतही महिला प्रवाशी त्यांच्यासाठीची ‘तेजस्विनी’ तैनात असताना सर्वसाधारण बसची वाट धरतात. त्यामुळे महिला प्रवाशी असूनही ‘तेजस्विनी’ला पूर्णपणे प्रतिसाद मिळत नाही. परिणामी महिला प्रवाशी आले तर ठीक अन्यथा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बस खुली असेल, असे धोरण बेस्ट प्रशासनाने स्वीकारल्याचे दिसत आहे.

याविषयी बेस्ट सीएसएमटी बस स्थानकातील उपस्थित अधिकाऱ्यांना विचारले असता, महिला नसतील तर रिकाम्या गाडय़ा चालवायच्या का? असा सवाल त्यांनी केला. शिवाय महिलांची वाट पाहत बसलो तर गाडय़ा अशाच उभ्या कराव्या लागतील. इंधनाचा खर्च भरून काढायचा असेल तर सर्वाना घेऊ न जाण्याशिवाय पर्याय नाही,असेही या कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. एकंदर चित्र पाहता तेजस्विनी बस सेवेबाबत बेस्ट प्रशासनात संभ्रमाचे तर प्रवाशांमध्ये अनभिज्ञतेचे वातावरण आहे.

आणखी ३७ गाडय़ा

सध्या सीएसएमटी ते एनसीपीए या एकमेव मार्गावर ही सेवा सुरू असून पुढे मुंबईतील आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणी ‘तेजस्विनी’ धावताना दिसणार आहे. त्यासाठी एकूण ३७ गाडय़ा संपूर्ण मुंबईमध्ये टप्प्याटप्प्याने येतील, असे बेस्टकडून सांगण्यात आले आहे.