मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यावरून राज्य दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) यांच्यातील संघर्षावर आणि दोन्हींनी केलेल्या तपासातील व्यापक विरोधाभासावर विशेष न्यायालयाने आपल्या निकालपत्रात बोट ठेवले आहे.

एटीएसच्या दाव्यानुसार, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना काश्मीरमधून आरडीएक्स मिळाले होते. ते त्यांनी त्यांच्या पुण्यातील घरात ठेवले. त्यानंतर त्यांनी बॉम्ब तयार करून एका फरारी आरोपीला दिला. या आरोपीने बॉम्ब मोटारसायकलवर ठेवला. तथापि, एनआयएच्या दाव्यानुसार, बॉम्ब इंदूरमधील दुचाकीत बसवला होता आणि नंतर तो मालेगाव येथे आणण्यात आला, असे विशेष न्यायालयाने निकालपत्रात एटीएस व एनआयए यांच्या तपासातील विसंगती दर्शवताना नमूद केले. आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग, स्फोटकांची, स्फोट घडवण्यात आलेल्या वाहनाची वाहतूक करण्याबाबतही दोन्ही तपास यंत्रणांचे दावे परस्परविरोधी आहेत, असे विशेष न्यायालयाने या प्रकरणातून माजी भाजप खासदार प्रज्ञासिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सर्व सात आरोपींना निर्दोष सुटका करताना स्पष्ट केले.

सर्व बाजूने तपास नाही

या बॉम्बस्फोटामागे स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडियाचा (सिमी) हात असल्याचा आरोपींनी केलेला दावा विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावला असला तरी तपास यंत्रणेने प्रत्येक बाजूने तपास करायला हवा होता, अशी टिप्पणी न्यायालयाने निकालपत्रात केली आहे.

परमबीर सिंहांकडून आदित्यनाथांचे नाव घेण्याचा दबाव

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही कार्यकर्त्यांची नावे घेण्यासाठी तत्कालीन एटीएस अधिकारी श्रीराव आणि परमबीर सिंह यांनी दबाव टाकला. तसे न केल्यास छळ करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा दावा एका साक्षीदाराने जबाबात नोंदवल्याचे विशेष न्यायालयाने नमूद केले.

एटीएस अधिकाऱ्यांनी केलेल्या छळाबाबत चिंता

आरोपींनी तसेच साक्षीदारांनी एटीएस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या आणि त्यांना बेकायदा ताब्यात ठेवल्याच्या आरोपांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. तसेच, याच आधारे एटीएसच्या तपासाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न उपस्थित केले.

फरारी आरोपींनी बॉम्ब तयार केल्याच्या दाव्याची दखल

या प्रकरणातील फरारी आरोपी रामजी उर्फ रामचंद्र कलसांगरा आणि संदीप डांगे यांनी बॉम्ब तयार केल्याचा दावा एटीएस आणि एनआयए या दोन्ही तपास यंत्रणांनी केला आहे. त्यांचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे आढळून आले आहे, परंतु त्यांचा ठावठिकाणा सापडत नसल्याचे एनआयएने आरोपपत्रात म्हटले आहे. त्यामुळे, या दोन आरोपींना अटक करण्यात आल्यास त्यांच्यावर स्वतंत्र आरोपपत्र दाखल करून खटला चालवण्याची मुभा विशेष न्यायालयाने एनआयएला दिली.