मुंबईमधील धक्कादायक प्रकार… कचऱ्यात बसवून सडलेलं अन्न खायला लावलं; Video Viral झाल्यानंतर गुन्हा दाखल

हा सर्व संतापजनक प्रकार २१ जुलै रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये काहीजण या पीडित तरुणाला दमदाटी करताना दिसत आहेत.

Viral Video Mumbai
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाची दखल घेण्यात आली. (फोटो सोशल नेटवर्किंगवरुन साभार)

एकमेकांवरील राग व्यक्त करण्यासाठी किंवा सूड उगवण्यासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. असाच एक धक्कादायक प्रकार मुंबईमधील जोगेश्वरीमधून समोर आलाय. येथे काहींनी एका तरुणाला कचऱ्यामध्ये बसवून कचऱ्यातील सडलेलं अन्न खायला भाग पाडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. विशेष म्हणजे ज्या आरोपांनी या तरुणाला कचऱ्यातील सडलेलं अन्न खायला भाग पाडलं त्यांनीच हा व्हिडीओ शूट करुन व्हायरल केलाय. वैयक्तिक वादामधून आरोपींनी हे कृत्य केल्याचं प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता जोगेश्वरी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा तपास पोलीस करत असून या प्रकरणात एकाला अटक करण्यात आलीय. या प्रकरणातील एकजण अद्याप बेपत्ता आहे. पोलीस सध्या त्याच्या मागावर आहेत.

हा सर्व संतापजनक प्रकार २१ जुलै रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये काहीजण या पीडित तरुणाला दमदाटी करताना दिसत आहेत. दमदाटी करुन या तरुणाला कचऱ्याच्या ढीगात बसवलं जातं. यावर या लोकांचा क्रुरपणा थांबात नाही. नंतर त्यांनी या तरुणाला कचऱ्यामधील वास येणारं, सडलेलं अन्न खाऊ घातलं. एवढं करुनही भागलं नाही म्हणून या आरोपींनी तरुणाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्येच झोपण्यास भाग पाडलं. एकीकडे आरोपी या सर्व गोष्टींची मजा घेत असतानाच दुसरीकडे हा तरुण मात्र हात जोडून माफी मागताना दिसत आहे. आपल्याला हे सारं करण्यास भाग पाडू नका अशी विनवी तो आरोपांनी करताना व्हिडीओमध्ये दिसतोय.

मात्र आरोपींना या तरुणाची काहीच दयामाया आली नाही. त्यांनी या तरुणाला दमदाटी करुन कचऱ्यातील अन्न खायला लावण्याबरोबरच कचऱ्यामध्ये लोळण्यासही सांगितलं. आरोपींनी या तरुणावर बसाच वेळ हा अत्याचार सुरु ठेवला. मात्र नक्की या आरोपी आणि पिडीत तरुणामध्ये कशामुळे वाद झालेला हा अद्याप समोर आलेलं नाही. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून आरोपींविरोधात संताप व्यक्त केला जातोय. हा व्हिडीओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय की पोलिसांनी त्याची दखल घेत गुन्हा नोंदवून घेत कारवाईला सुरुवात केलीय. व्हिडीओमध्ये या तरुणावर अत्याचार करुन त्याला अशापद्धतीने अमानुष वागणूक देणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली असून एकजण फरार आहे. पोलीस या फरार आरोपीच्या मागावर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Man made to eat stink and rotten food video goes viral scsg

फोटो गॅलरी