दहिसर येथे क्षुल्लक वादातून एका इसमाची हत्या करण्यात आली असून या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. दहिसर (प.) येथील आनंद नगरमधील अंबिका स्टोअर्समध्ये शुक्रवारी रात्री फुलचंद यादव (५०) काही जणांसोबत मद्यपान करीत बसले होते. गिरणी मालक असलेले फुलचंद यांचा भाजी विक्रेता रमेश मदेसिया (२०) याच्याबरोबर क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. शनिवारी सकाळी दुकानातून बाहेर रक्त येत असल्याचे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले आणि त्यानंतर दुकानाचे शटर्स उघडण्यात आले. त्यावेळी फुलचंद यादव रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. डोक्यात हातोडय़ाचे वार करुन त्यांची हत्या करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी रमेश मेदसिया याला ताब्यात घेतले आहे.