मुंबई: मुंबईत पावसाळ्यात दरड कोसळून जिवीतहानी व वित्तहानी होण्याची दाट शक्यता असणाऱ्या दरडप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्याची तसेच धोकादायक ठिकाणी संरक्षक भिंत व जाळी बसविण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही आपत्ती व्यवस्थापनमंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

सुनील राऊत, अजय चौधरी, राम कदम आदींनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेदरम्यान महाजन यांनी सांगितले की, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेच्या माध्यमातून २०१७मध्ये मुंबईतील दरडप्रवण क्षेत्रांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी २५० ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका असल्याचे निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ७४ ठिकाणे धोकादायक त्यातही ४६ ठिकाणे अति धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यातही दरडी कोसळण्याचा अधिक धोका असलेली ४० ठिकाणे उपनगरात आहेत.

विक्रोळी पार्कसाईट (प.), साकीनाका, भांडुप, घाटकोपर हा भाग बहुतांश डोंगराळ वस्तीचा असून, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण यांनी केलेल्या पाहणीच्या अनुषंगाने या एस विभागात १६१ ठिकाणी दरड कोसळण्याचा संभाव्य धोका आहे व त्यापैकी १३ ठिकाणे ही मध्यम ते गंभीर या प्रवर्गात असल्याची माहिती महाजन यांनी दिली.

पावसाळ्यात डोंगराळ भागात जिवित व वित्त हानी टाळण्याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत आधार भिंतीलगत व संभाव्य दरड कोसळणाऱ्या भागातील घरांना सावधान नोटिसा देऊन घरे रिकामी करण्यात येतात व तेथे सावधान फलक ही लावण्यात येतात. तसेच, महानगरपालिकेमार्फत अति धोकादायक वास्तुमधील रहिवाशांना तात्पुरत्या निवासी केंद्रात स्थलांतरीत करण्यात येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संभाव्य भुस्खलनाच्या ठिकाणी जिओ नेटिंगचे काम करण्याकरीता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास पालिकेने ९ कोटी रुपये दिले असून शहरात विविध ठिकाणी दरडींच्या ठिकाणी संरक्षणक भिंती बांधण्यासाठी ११.६३ कोटी रुपये खर्चाच्या कामांना मंजूरी देण्यात आली आहे. शहरातील दरडी कोसळण्याच्या धोकादायक ठिकाणांचे आठ वर्षापूर्वी सर्वेक्षण झाले असून पुन्हा एकदा सर्वेक्षण केले जाईल असेही महाजन यांनी स्पष्ट केले.