मुंबई : मराठी साहित्य व रंगभूमीची गेली ९० वर्षे अविरत सेवा करणारी गिरगावातील अग्रगण्य संस्था ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या निवडणुकीत कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा हे सक्रिय झाल्याने साहित्य वर्तुळात चलबिचल निर्माण झाली आहे. संघाच्या जागेवर डोळा ठेवून निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप वाढल्याची ओरड आता होऊ लागली असून भविष्यात साहित्य संघाचे मराठीपणच हरवून जाईल, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. मुंबई शहरात मराठी भाषा आणि साहित्य यांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. अ. ना. भालेराव यांनी

१९३५ मध्ये मुंबई मराठी साहित्य संघाची स्थापना गिरगावातील निवासस्थानी सुरू केली होती. मुंबई मराठी साहित्य संघाने साहित्य संमेलनापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. १९६४ मध्ये गिरगावातील केळेवाडीत साहित्य संघमंदिर नाट्यगृह उभारण्यात आले. पुढे संस्थापक भालेराव यांचे सुपूत्र डॉ. रा. अ. ऊर्फ बाळ भालेराव यांनी साहित्य संघाच्या प्रगतीत मोठा हातभार लावला. भालेराव पिता-पुत्रांनी संगोपन करून वटवृक्षात रूंपातर केलेल्या या संस्थेवर डोळा ठेवून राजकारणी या निवडणुकीत उतरले असल्याचा आरोप होत आहे.

या निवडणुकीत अभिनेते व नाट्यशाखेचे विद्यामान कार्यवाह प्रमोद पवार यांचा ‘भालेराव विचार मंच’ आणि ‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’च्या माजी अध्यक्ष व संस्थेच्या विद्यामान कार्याध्यक्ष प्रा. उषा तांबे यांचे ‘ऊर्जा पॅनेल’ यांच्यात दुरंगी लढत आहे. अध्यक्ष, ७ उपाध्यक्ष आणि ३५ नियामक मंडळ सदस्यांना १४०० मतदार निवडून देतील. १७ सप्टेंबर मतदानाचा अखेरचा दिवस आहे. भाजप आणि रा. स्व. संघाशी संबंधित मंडळींनी ‘भालेराव विचार मंच’ हे पॅनेलला नाव देऊन मतदारांचा वैचारिक गोंधळ केल्याचा आरोप करण्यात येत आहे. भालेराव यांच्या विचारांची मंडळी ऊर्जा पॅनेलमधून निवडणूक लढवीत आहेत.

साहित्य संघाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. कुरिअर कंपनीला हाताशी धरून मतदारांना मतपत्रिका मिळू नये अशी व्यवस्था करण्यात आली, तसेच निवडणूक अधिकाऱ्यांशी संगनमत करत ४०० मतपत्रिका दडवून ठेवल्या, असा आरोप ‘भालेराव विचार मंच’ने केला. संस्था कार्यात महिलांना प्राधान्य, कलाकार-साहित्यिकांनाच संधी आणि राजकीय भूमिकेचा त्याग ही भालेराव पिता-पुत्रांची तत्त्वे ‘भालेराव मंच’ने पायदळी तुडवली असून भाजप पुरस्कृत पॅनेल निवडणुकीत उतरवल्याचा आरोप ‘ऊर्जा मंच’ने केला.

भाजपचे स्थानिक आमदार, बांधकाम विकासक व राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा संस्थेचे मानद सदस्य आहेत. लोढा यांनी मतदान केल्याचे छायाचित्र ‘भालेराव मंच’ने समाज माध्यमावर टाकले. ‘भालेराव मंच’ हा भाजप पुरस्कृत पॅनेल असून चर्नी रोडला सैफी रुग्णालय शेजाच्या केळेवाडीतील साहित्य संघाच्या चार मजली जीर्ण इमारतीवर लोढा यांचा डोळा असल्याचा आरोप होत आहे. गिरगावातील ‘विल्सन कॉलेज’चा जिमखान्याची जागा पालकमंत्रीपदाचे वजन वापरून लोढा यांनी ‘जैन इंटरनॅशल संस्थे’ला देण्यास भाग पडली ही पार्श्वभूमी लक्षात घेता गिरगावातील या जागेवर डोळा असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. मुंबईतील आणखी एक मराठी संस्था हातातून जाणार तर नाही ना, अशीही शंका या निमित्ताने घेतली जात आहे. मुंबई मराठी साहित्य संघ, एशियाटिक सोसायटी अशा काही संस्थांवर सत्ताधाऱ्यांचा डोळा असल्याचा आरोप होत आहे.

दोन्ही पॅनेलचे उमेदवार…

‘ऊर्जा पॅनेल’मध्ये ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर, ‘मॅजेस्टिक प्रकाशन’चे अशोक कोठावळे, नाट्यदिग्दर्शक विजय केंकरे, साहित्यिक अशोक बेंडखळे, अभिनेते चंद्रशेखर गोखले, संपादक सुहासिनी कीर्तीकर, मुंबई विद्यापीठाचे डॉ. दीपक पवार, साहित्यिक अनुपमा उजगरे अशी नावे आहेत. ‘भालेराव मंच’मध्ये ‘विवेक साप्ताहिक’चे रविंद्र गोळे, ‘साहित्य अकादमी’चे नरेंद्र पाठक, ‘केशव सृष्टी’चे विनोद पवार, ‘जनकल्याण बँके’चे चंद्रशेखर वझे, ‘मुंबई तरुण भारत’च्या योगिता साळवी, ‘संस्कार भारती’चे प्रमोद पवार, ‘कालनिर्णय’चे जयराज साळगावकर, ‘सारस्वत बँके’चे किशोर रांगणेकर अशी मंडळी दिसतात.

माझे आजोबा अमृत भालेराव संस्थेचे संस्थापक तर पिता बाळ भालेराव यांनी संस्था वाढवली. भालेरावांची तिसरी पिढी संस्थेसाठी कार्यरत आहे. मात्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधकांनी ‘भालेराव विचार मंच’ असे त्यांच्या पॅनेलला नाव दिले आहे.-अश्विनी भालेराव, ‘ऊर्जा पॅनेल’च्या उमेदवार

‘भालेराव विचार मंच’मध्ये संस्कार भारती, राष्टीय स्वयंसेवक संघ यांच्याशी संबंधित कार्यकर्ते हे नाट्य कलावंत- साहित्यिक असू शकतात. मंगलप्रभात लोढा यांना संघाचे सदस्यत्व विद्यामान कार्यकरिणीने दिलेले आहे. प्रमोद पवार, ‘भालेराव विचार मंच’चे उमेदवार

मी स्थानिक आमदार असून संघाचा सदस्य आहे, त्यामुळे मतदानाचा हक्क बजावला. पण म्हणून मला संस्था इमारतीच्या पुनर्विकासामध्ये रुची आहे, असा आरोप करणे मूर्खपणा आहे. मंगलप्रभात लोढाबांधकाम विकासक व मंत्री

मतदारांच्या घरी जाऊन मतपत्रिका गोळा करण्यासाठी ‘भालेराव मंच’ने अधिकार नसताना व्यक्ती नेमल्या आहेत. संस्थेची अंतर्गत निवडणूक असताना ‘भालेराव मंच’ जाहीर आरोप करत संस्थेची बदनामी करत आहे. उषा तांबे, ‘ऊर्जा पॅनेल’च्या अध्यक्षपदाच्या उमेदवार