मुंबई: मागील फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणारे मंगेश चिवटे आता ८ वर्षांनी अखेर त्याच कक्षाचे प्रमुख झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिवटे यांची याच कक्षात विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
२०१४ मध्ये राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाल्यावर मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची संकल्पना फडणवीस यांच्यापुढे मांडली. राज्यभरातील गरजू रुग्णांना उपचारासाठी मदत व्हावी, अशी त्याची रचना होती. नंतर सातत्याने त्याबाबत पाठपुरावा केला. अखेर सरकारी कारभाराच्या चौकटीत बसवून फडणवीस यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष सुरू केला होता. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी नंतर मंगेश चिवटे यांच्या या संकल्पनेचे आणि त्याबाबत केलेल्या पाठपुराव्याचे कौतुक केले होते.




राज्यात २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. त्यावेळी हा कक्ष बंद करण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्याकडे वैद्यकीय मदत पक्षाचे प्रमुख म्हणून काम करणारे चिवटे यांनी तो कक्ष पुन्हा सुरू व्हावा यासाठी पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांनाच या कक्षाचे विशेष कार्य अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवत हा मदत कक्ष पुन्हा सुरू केला आहे.