मुंबई : मानखुर्दच्या अगरवाडी परिसरात सध्या एका खासगी विकासकाकडून टोलेजंग इमारतीचे काम सुरू असून इमारतीत जाण्यासाठी मोठा रस्ता नसल्याने विकासकाने पालिकेला हाताशी धरून तेथील गावकऱ्यांना नोटिसा पाठवल्या आहेत. परिणामी गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना असून पालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
पालिकेच्या एम पूर्व विभागात हा अगरवाडी परिसर आहे. तेथील बालसुधारगृह परिसरात या खासगी इमारतीचे काम सुरू आहे. पूर्वी ही इमारत केवळ तीन मजल्याची होती. मात्र तेथील रहिवाशांनी एका खासगी विकासकाला हाताशी धरून तेथे इमारतीच्या पुनर्विकासकाचे काम सुरू केले आहे. आता २२ ते २३ मजल्याची टोलेजंग इमारत उभी राहणार असून या इमारतीतील घरांच्या किंमती कोटींच्या घरात आहेत.
मात्र त्या इमारतीत जाण्यासाठी रस्ता काहीसा अरुंद असल्याने विकासकाने पालिकेला हाताशी धरून रहिवाशांची घरे तोडण्याचा घाट घातला असल्याचा आरोप काही स्थानिकांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी पालिकेने तेथील ५० ते ६० घरांवर नोटिसा लावत तत्काळ पुरावे सादर करण्यास सांगितले. त्यामुळे सध्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याठिकाणी पूर्वीपासून मोठा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र इतक्या वर्षात तो का झाला नाही.
इमारतीचे काम सुरू झाल्यावरच या कामाला कशी गती आली असा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारले जात आहेत. जर पालिकेने या इमारतीसाठी आमच्या घरांवर कारवाई केली तर आम्ही पालिकेच्या एम पूर्व कार्यालयाबाहेर उपोषण सुरू करू असा इशारा यावेळी या गावकऱ्यांनी दिला आहे.हा रस्ता आराखड्यात प्रस्तावित आहे. विकासकाच्या फायद्यासाठी आम्ही याठिकाणी रस्ता बनवत असल्याचा नागरिकांचा आरोप चुकीचा आहे.
उज्वल इंगोले सहाय्यक आयुक्त, एम पूर्व विभाग
