डिसेंबरपासून कामाला सुरुवात
मुंबई : मनोरा आमदार निवास पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागणार असून पुनर्विकासाच्या बांधकाम निविदेला प्रतिसाद मिळाला आहे. तीन कंपन्यांनी पुनर्विकासासाठी उत्सुकता दर्शविली आहे. त्यानुसार महिन्याभरात या तीन कंपन्यांपैकी एका कंपनीला कंत्राट देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने के ले आहे.
नरिमन पॉइंट येथे राज्यातील आमदारांच्या निवासासाठी १९९४ मध्ये बांधण्यात आलेले मनोरा आमदार निवास २०१७ मध्ये अतिधोकादायक इमारतींच्या यादीत गेले. इमारतीचा काही भागही कोसळला. त्यानंतर मनोराचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेत २०१९ मध्ये ही वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. तर २०२१ मध्ये नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनकडून (एनबीसीसी) पुनर्विकासाचे काम काढून घेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले. त्यानुसार हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काही महिन्यांपूर्वी निविदा मागविण्यात आली. १८ ऑगस्टला निविदा उघडण्यात आली. मात्र या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. केवळच एकच निविदा सादर झाली. ९०० कोटींच्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा काढण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली.
पुनर्निविदेची मुदत नुकतीच संपली असून या वेळी मात्र निविदा प्रक्रि येला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मनोज सौनिक, अप्पर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. तीन कंपन्यांनी निविदा सादर केल्या आहेत. महिन्याभरात निविदा अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती होईल आणि डिसेंबरमध्ये कामाला सुरुवात होईल असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
असा आहे प्रकल्प :
* १४ मजली इमारतीच्या जागेवर दोन इमारती
* एक इमारत २५ मजली तर दुसरी ४० मजली
* अंदाजे खर्च ९०० कोटी रुपये
* ६०० हून अधिक खोल्या
* १००० चौ. फूट क्षेत्रफळाच्या खोल्या * सर्व पंचतारांकित सुविधांचा समावेश