मुंबई : आझाद मैदान आणि परिसरातील हॉटेल, चहा, नाश्ता आणि वडापावचे गाडे शनिवारी सुरू झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी हॉटेल बंद असल्यामुळे मराठा आंदोलकांची मोठी अडचण झाली होती. मैदान परिसरात स्वच्छतागृहाची सोय करण्यात आल्यामुळे शनिवारी आंदोलकांसमोरील अडचणी काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले.

आझाद मैदान परिसरात शुक्रवारपासून मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाले. मात्र, शुक्रवारी पोलिसांनी हॉटेल, चहा, नाश्त्याचे, वडापावचे गाडे बंद करायला लावल्यामुळे आंदोलकांना चहा, पिण्याचे पाणी मिळणे ही दुरापास्त झाले होते. आंदोलकांनी गावाकडून येतानाच खाण्या-पिण्याची सोय केली होती. पण वाहने पार्किंगमध्ये लागल्यामुळे आंदोलकांचे खाण्या – पिण्याचे मोठे हाल झाले होते.

शनिवारी आझाद मैदान परिसरातील हॉटेल, वडापाव, चहाचे गाडे सुरू झाल्यामुळे आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला. पावसाने उघडीप दिल्यामुळे आंदोलक इतरत्र फिरतानाही दिसून आले. दुपारनंतर मात्र पावसाने हजेरी लावल्यामुळे आंदोलकांची तारांबळ उडाली. शुक्रवारी आझाद मैदान परिसरात स्वच्छतागृहाची कोणतीही सोय नव्हती. पण, शनिवारी सकाळपासूनच मैदान परिसरात स्वच्छतागृहाची सोय केल्यामुळे आंदोलकांना दिलासा मिळाला.

मराठवाडा आणि मुंबईतील मराठा उद्योगपतींकडून जेवणाची पाकिटे आंदोलकांना वाटण्यात आली. तसेच मराठवाड्यासह मुंबईतील मराठा बांधवांकडून भाकरी आणि बेसनची पुरवठा करण्यात आला. त्यामुळे शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी आंदोलकांना अनेक बाबत अनेक बाबतीत दिलासा मिळाल्याचे दिसून आले.

सोमवारपासून आंदोलनाची तीव्रता वाढणार

सोमवारपासून आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. उद्या, रविवारी आंदोलनावर तोडगा न निघाल्यास सोमवार आणि मंगळवारी ग्रामीण भागांतून आणखी मराठा आंदोलन मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे. शिवाय अन्नपाण्याची रसद ही मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.