Marathi Actor Ketaki Chitale on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी अटक झालेल्या मराठी अभिनेत्री केतकी चितळेची सुटका झाली आहे. २२ जूनला जामीन मंजूर झाल्यानंतर २३ जूनला केतकी चितळेची ठाणे कारागृहातून सुटका करण्यात आली होती. दरम्यान जेलमधून बाहेर आल्यानंतर केतकी चितळेने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत पोलीस कोठडीत असताना आपला विनयभंग झाल्याचा गंभीर आरोप केला आहे.

“बेकायदेशीरपणे मला माझ्या घरातून अटक करण्यात आली होती. कोणतीही नोटीस, अटक वॉरंट नसताना मला जेलमध्ये टाकण्यात आलं. मी कोणतंही बेकायदेशीर कृत्य केलं नव्हतं. मी सत्य बोलले होते, त्यामुळे मी त्याचा सामना करु शकत होते,” असं केतकीने म्हटलं आहे.

“मला मारहाण झाली, विनयभंग झाला. पोलीस कोठडीत असताना माझ्यावर शाईच्या नावाखाली विषारी काळा रंग टाकला होता,” असा आरोप केतकीने केला आहे.

पवारांसंबंधी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या केतकी चितळेची कारागृहातून सुटका; बाहेर आल्यावर हसत म्हणाली, “जेव्हा…”

“दिलासा मिळाल्याने मी कारागृहातून बाहेर येताना चेहऱ्यावर हास्य होतं. पण मी जामिनावर बाहेर आहे. अद्याप लढाई सुरु आहे,” असंही केतकीने म्हटलं आहे. आपल्याविरोधात २२ गुन्हे दाखल असून त्यातील एका गुन्ह्यात जामीन मिळाल्याचं यावेळी केतकीने सांगितलं.

आपल्या वादग्रस्त पोस्टसंबंधी बोलताना केतकीने सांगितलं की, “त्या पोस्टमध्ये फक्त पवार असा उल्लेख असताना लोकांनीच ते शरद पवारांसंबंधी आहे असा अर्थ लावला”. तिने सांगितलं की, “पोस्टमध्ये मी कोणाचाही अपमान केला नव्हता. लोकच शरद पवार तसे आहेत असं सांगण्याचा प्रयत्न करत आहेत का? माझ्याविरोधात तक्रार करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आणि इतर लोकांना मला हे विचारायचं आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय झालं होतं?

टीव्ही मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे हिने तिच्या फेसबुक खात्यावर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकुर प्रसारित केला होता. या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्नील नेटके यांनी केतकी चितळेविरोधात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याआधारे तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट एकने केतकीला नवी मुंबईतील कळंबोली येथून अटक केली होती.

न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर केतकीने या प्रकरणात जामीन मिळविण्यासाठी वकिलांमार्फत ठाणे न्यायालयात अर्ज केला होता. अखेर महिन्याभरानंतर ठाणे न्यायालयाने तिला याप्रकरणात जामीन मंजूर झाला होता.