scorecardresearch

भाषामंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज दिल्लीत ; मराठीला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न

मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळावा, यासाठी सर्व क्षेत्रांतील मान्यवर एकटवले असून या जनअभियानात सहभागी झाले आहेत.

भाषामंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज दिल्लीत ; मराठीला अभिजात दर्जा देण्याचा प्रश्न

मुंबई : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दिल्लीला जात असून ते आज, सोमवारी केंद्रीय सांस्कृतिकमंत्री जी. किसन रेड्डी आणि राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांची भेट घेणार आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतचा प्रश्न गेली अनेक वर्षे केंद्राकडे प्रलंबित आहे. त्यासाठी आता राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला आहे. या अनुषंगाने मराठी भाषामंत्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एक जनअभियान सुरू करण्यात आले आहे. मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळावा, यासाठी सर्व क्षेत्रांतील मान्यवर एकटवले असून या जनअभियानात सहभागी झाले आहेत. हा प्रश्न आता शेवटच्या टप्प्यात आला आहे. तो धसास लावण्यासाठी देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आज, सोमवारी केंद्रीय मंत्र्यांना भेटणार आहे. या शिष्टमंडळात प्रधान सचिव भूषण गगराणी आणि लेखक-दिगदर्शक श्रीरंग गोडबोले यांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री रेड्डी आणि अर्जुन राम मेघवाल यांची भेटॠ़ळ घेऊन महाराष्ट्रातील नामवंत लेखक, विचारवंत आणि मराठी कलाकार अशा अनेक मान्यवरांची स्वाक्षरी असलेले विनंतीपत्र देण्यात येणार आहे. २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आहे आणि त्याआधी मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळावा, अशी आमची आग्रही मागणी आहे. त्यासाठी दिल्लीतील मराठी नेतेमंडळी आणि अधिकारी ह्यांची भेट घेऊन त्यांच्याशीही संवाद साधणार आहोत, असे देसाई यांनी सांगितले. आवश्यकता भासल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनाही दूरध्वनीवरून आग्रहाची विनंती करणार असल्याचेही ते म्हणाले.

सहा भाषा अभिजात

सध्या देशातील सहा भाषांना ‘अभिजात’ दर्जा मिळाला आहे. तमिळ (२००४), संस्कृत (२००५), कानडी (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि उडिया (२०१४).

निकष कोणते?

– दीड ते २००० वर्षांच्या कालावधीतील त्या भाषेतील प्रारंभिक ग्रंथ / नोंदींची उच्च प्राचीनता. 

– त्या भाषेतील प्राचीन ग्रंथांचा एक असा भाग जो पिढय़ानपिढय़ा मौल्यवान वारसा समजला जातो.

– त्या भाषेला मूळ साहित्यिक परंपरा असणे आवश्यक, ती अन्य भाषक समुदायाकडून घेतलेली असू नये.

– अभिजात भाषा आणि साहित्य आधुनिक भाषेपेक्षा वेगळे असल्याने, अभिजात भाषा आणि तिचे नंतरचे स्वरूप किंवा तिच्या शाखांमध्ये फरक असू शकतो.

(संदर्भ : केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने २०१४ मध्ये राज्यसभेत दिलेली माहिती.)

२७ फेब्रुवारीच्या मराठी भाषा दिनाआधी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नामवंत लेखक, विचारवंत आणि मराठी कलाकार यांच्या स्वाक्षरीचे पत्र केंद्र सरकारला देण्यात येणार आहे. 

सुभाष देसाई, मराठी भाषामंत्री

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2022 at 00:18 IST

संबंधित बातम्या