मुंबईसह राज्यभरातील रिक्षा परवान्यांच्या वाटपासाठी पहिल्यांदा ऑनलाइन सोडत काढणाऱ्या परिवहन विभागाच्या या उपक्रमाचे कौतुक होत असले, तरी मुंबईत मात्र या सोडतीत फक्त ३० टक्के परवानेच भूमिपुत्रांच्या नशिबी आले आहेत. मुंबईत एकूण सुमारे २० हजार परवान्यांचे वाटप करण्यात येणार होते. यापैकी ७० टक्के परवाने हे अन्यप्रांतीय रिक्षाचालकांना मिळाल्याचे बोलले जात आहे. मात्र प्रत्यक्ष अर्जाच्या तपासणीनंतर यातील बहुतांश रिक्षाचालकांचे अर्ज बाद ठरण्याची शक्यता असून तेथे मराठी रिक्षाचालकांची वर्णी लागू शकते.
रिक्षा परवान्यांच्या वाटपासाठी पहिल्यांदाच राज्यात ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि ऑनलाइन सोडत पद्धत वापरली गेली. या नव्या पद्धतीप्रमाणे मुंबईतील तब्बल २० हजारांहून अधिक परवान्यांचे वाटपही झाले. सध्या सोडतीमध्ये भाग्यवान ठरलेल्या अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. सोडत जाहीर झालेल्यांच्या प्राथमिक यादीत मुंबई विभागात ७० टक्के अन्यप्रांतीय असल्याचे समोर आले होते. एरवी अन्यप्रांतीयांचा टक्का वाढल्यानंतर करता येणारी ओरड सोडत ऑनलाइन सोडतीमुळे करता येत नव्हती. पण स्थानिक रिक्षाचालकांमध्ये याबाबत नाराजी होती.
सोडत जाहीर झाल्यानंतर भाग्यवान अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी १ मार्चपासून करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानुसार आता काटेकोरपणे कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. या दरम्यान वास्तव्याच्या दाखल्यापासून शालेय प्रमाणपत्रांपर्यंत अनेक गोष्टींची तपासणी होणार आहे. या प्रक्रियेत अन्यप्रांतीय रिक्षाचालक बाद ठरून त्यांच्या ऐवजी सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या मराठी रिक्षा चालकांचा टक्का वाढण्याची शक्यता आहे, असे परिवहन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.