कुलदीप घायवट
मुंबईच्या किनारपट्टीवर अनेक समुद्री जीव आढळतात. सध्या बेटांनी तयार झालेल्या मुंबईचे रुपडे पूर्णपणे पालटले आहे. दररोज वाढणारी लोकसंख्या, औद्योगिकीकरण, समुद्रात सुरू असलेले विकास प्रकल्प यामुळे समुद्रीजीवांच्या भोवताली तयार होणाऱ्या मृत्यूच्या सापळय़ावर मात करून अनेक समुद्री जीवांची जैवविविधता टिकून आहे. मुंबईच्या १४९ किमीच्या समुद्र किनाऱ्यावर अनेक जलचर समुद्राच्या उदरात जगत आहेत. मुंबईच्या उत्तर भागापासून दक्षिण भागापर्यंत सागरी परिसंस्थेचे दर्शन होते. मुंबईतील समुद्राच्या भरती-ओहोटीच्या कालावधीत रंगीबेरंगी प्रवाळांचे जग दिसून येते.
देशात प्रमुख प्रवाळ भित्तिका या मन्नारचे आखात, पाल्क समुद्रधुनी, कच्छचे आखात, अंदमान आणि निकोबार बेटे, लक्षद्वीप बेटांच्या ठिकाणी आढळतात. देशाच्या मध्य – पश्चिम किनाऱ्यावर, मुंबईच्या समुद्री किनारी भागातही बऱ्याच प्रमाणात प्रवाळे दिसतात. प्रवाळ या अपृष्ठवंशीय जीवांचे सामान्यत: कठीण प्रवाळ आणि मृदू प्रवाळ असे त्याचे दोन प्रकार असतात. काही ठिकाणी एकाच प्रवाळांच्या अनेक प्रजाती एकत्र असतात तर काही ठिकाणी त्या स्वतंत्रपणे रुजतात. मुंबईच्या सागरी भागात सुमारे पाचशेहून अधिक सागरी जीवांच्या प्रजाती आहेत. यात प्रवाळांचा देखील समावेश आहे. मुंबईच्या किनारी भागात प्रवाळांचे साधारण ११ प्रकार आढळतात. मलबार हिल, हाजी अली, वांद्रे, जुहू, कफ परेड, मरिन ड्राईव्ह, वरळी या भागात प्रवाळांचे अस्तित्व आहे. मुंबईतील आंतरभरतीच्या भागात सॉफ्ट कोरल, फॉल्स पिलो कोरल, फ्लॉवरपॉट कोरल, कॅरिओफिलीड, राहिझॅगिलीड, स्टोनी कोरल, टुबास्ट्रोड, वेरेटिलीड, कुलिका, प्लेक्सारिड, स्कुटेलियम या प्रकारातील प्रवाळ आढळतात.
गेल्या २०० ते ३०० दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर प्रवाळ भित्तिका विकसित झाली असून मुंबईत देखील प्रवाळांची संख्या मुबलक आहे. मात्र, सागरी किनारी मार्ग (कोस्टल रोड) प्रकल्पांमुळे मुंबईतील समुद्राच्या भरती-ओहोटीमधील प्रवाळांचे जग सर्वासमोर आले. सागरी किनारी मार्गामुळे वरळी, हाजीअली येथील प्रवाळ बाधित होणार असल्याने त्यांना कुलाबा येथील नेव्ही नगरच्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. परंतु, आताही हाजी अली येथे ‘फॉल्स पिलो’ प्रवाळे दिसतात.
१९७२ च्या वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत प्रवाळ क्षेत्रांना वाघ व हत्ती अशा (शेडय़ुल १) प्रजातीप्रमाणे संरक्षण देण्यात आले आहे. प्रवाळ खडकाळ समुद्र आणि किनारपट्टी दरम्यान लाटांचा प्रभाव रोखतात आणि किनारपट्टीची धूप होण्यापासून वाचवतात. अनेक प्रजातींचे मासे, कासवे, कोलंबी, ऑक्टोपस, खेकडे या जिवांचे प्रवाळ हे आश्रयस्थान आहे. समुद्री जीवांना अन्न पुरवण्याचे कामही प्रवाळे करतात. त्यामुळे ती मत्स्य उत्पादनाचा कणाही आहेत.
कठोर प्रवाळ स्वत:भोवती ‘कॅल्शियम काबरेनेट’चे आवरण तयार करतात. कॅल्शियम काबरेनेट’च्या आवारणामुळे एका प्रवाळाला (पॉलीप) संरक्षण मिळते. तर, अनेक पॉलिप्स एकत्र समूहात राहिल्यास त्याची वसाहत तयार होते. या पॉलिप्सचा आकार फुलासारखा दिसतो. तसेच, अनेक प्रवाळांचा आणि एकपेशीय वनस्पतींचा परस्पर संबंध आल्याने एकपेशीय वनस्पतींपासून प्रवाळांना त्यांचे रंग प्राप्त होतात. त्यामुळे हे प्रवाळ रंगीत आकर्षित फुलासारखे दिसतात. त्याचप्रमाणे, प्रवाळ खडक किंवा प्रवाळ भित्तिका ही समुद्रातील प्रवाळ जीवांनी तयार केलेल्या कॅल्शियम काबरेनेटपासून निर्माण होते. प्रवाळ भित्तीका ही समुद्राच्या तळावरील लाखो पॉलीप्सने तयार केलेली रचना आहे. परंतु, समुद्र – महासागराचे वाढते तापमान, अनियोजित मासेमारी, प्रदूषण या कारणांमुळे लाखो वर्षांपासून असलेल्या प्रवाळ परिसंस्थेचा आता ऱ्हास होऊ लागला आहे.