मुंबई : कांजूरमार्ग येथील आर. देशमुख मार्गावरील गांधी मार्केटजवळ असलेल्या एन. जी रॉयल पार्क इमारतीला रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाले नाही. सद्यस्थितीत अग्निशमन दलातर्फे आग विझविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. एन. जी रॉयल पार्क या २० मजली इमारतीच्या १६ ते १८ व्या मजल्यादरम्यान आग पसरली.
विद्युत वाहिन्यांमध्ये आग पसरल्याचे लक्षात रहिवाशांनी तात्काळ इमारतीबाहेर पळ काढला. तसेच, दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले. आगीमुळे इमारतीत प्रचंड धूर निर्माण झाल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अग्निशमन दलाचे ३ फायर इंजिन आणि अन्य अद्ययावत यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहे. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी आग भीषण स्वरूपाची (क्रमांक -१ ची वर्दी) असल्याचे घोषित केले. तसेच, आग विझविण्यासाठी अद्यापही अग्निशामक प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.