मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) अखेर घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकरनगर आणि कामराज नगर पुनर्विकासासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेनुसार पहिल्या टप्प्यात सहा पुनर्वसित इमारती बांधण्यात येणार असून या इमारतींचे बांधकाम तीन वर्षांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात सहा पुनर्वसित इमारतींअतर्गत ४०५३ घरे बांधण्यात येणार असून या घरांच्या बांधकामासाठी अंदाजे १४५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पात येथील १६९४ घरे बाधित होत आहेत. बाधित घरांसह १४ हजारांहून अधिक घरांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संयुक्त भागिदारी तत्वावर एमएमआरडीए आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून पुनर्विकास केला जाणार आहे. टप्प्याटप्प्याने हा पुनर्विकास केला जाणार असून पहिल्या टप्प्याअंतर्गत १७ एकर जागेवरील झोपड्यांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील सहा पुनर्वसित इमारतींचे बांधकाम करण्यासाठी एमएमआरडीएने शनिवारी निविदा प्रसिद्ध केली आहे. या निविदेनुसार सहा इमारतींच्या बांधकामासाठी तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे ४०५३ पात्र रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न येत्या तीन वर्षांत पूर्ण होणार आहे. तर २४ महिन्यांचा दोष दायित्व कालावधी असणार आहे. इच्छुक विकासक, कंपन्यांना २८ मेपासून निविदा सादर करता येणार असून निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १४ जून आहे.
पहिल्या टप्प्यातील सहा इमारतींमध्ये ३०० चौरस फुटांच्या ४०५३ घरांचा समावेश असणार आहे. तर पुनर्वसित इमारतींचा दर्जा आणि इमारतीतील सुविधांवर विशेष भर दिला जाणार आहे. या इमारतींमध्ये आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधांचा समावेश असणार आहे. पहिल्या टप्यातील पुनर्वसित इमारतींच्या बांधकामासाठी अंदाजे १४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील चार हजारांहून अधिक झोपडीधारकांची पात्रता निश्चिती झोपु प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. पात्र रहिवाशांना दोन वर्षांच्या घरभाड्याचा धनादेश वितरीत करण्यात आला आहे. या सर्व झोपड्या हटवून १७ एकरचा भूखंड रिकामा करण्यात आला आहे. हा भूखंड झोपु प्राधिकरणाकडून लवकरच एमएमआरडीएकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. भूखंड हस्तांतरित झाल्यानंतर आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंत्राट अंतिम करून पहिल्या टप्प्यातील सहा पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाला सुरुवात होणार आहे. काम सुरू झाल्यापासून तीन वर्षांत इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.