मुंबईतील पारा चाळिशीपार

मुंबई, पुणे : मे महिन्यातील रखरखाटासारखा उन्हाळा यंदा मार्च महिन्यापासून जाणवत असला, तरी शनिवारी अंग भाजून काढणारी लाहीलाही राज्यातील अनेक भागांत नागरिकांनी अनुभवली. कोकण विभागातील उष्णतेची लाट गेले दोन दिवस तीव्र असून, मुंबईच्या सांताक्रूझ केंद्रावर शनिवारी कमाल तापमानाचा पारा ४०.९ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला. हे तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बल ७.७ अंशांनी अधिक होते. यापूर्वी २८ मार्च १९५६ रोजी सांताक्रूझ येथे ४१.७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती, तर मार्च २०१३ मध्ये ४०.५ अंश आणि मार्च २०११ मध्ये ४१.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती.

मुंबई परिसरासह कोकण विभागात काही ठिकाणी तीन दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. शुक्रवारपासून उष्णतेची लाट तीव्र झाली. रत्नागिरीत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीच्या तुलनेत तब्बत ८.२ अंशांनी अधिक होते.

कारण काय?

राज्यात सध्या कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती आहे. कमी दाबाचे पट्टे विरून गेले आहेत. राजस्थानात निर्माण झालेले उष्ण वारे पूर्वेकडून महाराष्ट्रात प्रवेश करत असल्याने मुंबईसह कोकणातील वातावरणात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत आहे. ही उष्णतेची लाट रविवारपासून ओसरेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

नुसती काहिली…

शनिवारी विदर्भातील चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ४१.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. अमरावती, ब्रह्मपुरी, नागपूर आणि वर्धा या भागांत तापमानाचा पारा ३९ अंशांवर होता. मध्य महाराष्ट्रात जळगाव आणि सोलापूरमध्ये ४० अंशांपुढे, तर पुणे, नाशिक, सांगली, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड आदी ठिकाणी कमाल तापमान ३८ ते ३९ अंशांच्या दरम्यान होते.