दलित, मागासवर्गीयांचे प्रश्न तसेच वाढती महागाई आदी समस्या निर्माण होण्यास देशातील काँग्रेस, भाजप व इतर पक्षच जबाबदार असल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख खासदार मायावती यांनी केला. ‘सर्वजनहिताय सर्वजनसुखाय’ अशी परिस्थिती देशात आणायची असेल तर या पक्षांना पुन्हा सत्तेत न आणता बहुजन समाज पक्षाला केंद्र व राज्यात संधी द्या, असे आवाहन करत पंतप्रधानपदासाठीची आपली दावेदारी मायावती यांनी जाहीर केली. येथील कस्तुरचंद पार्कवर मायावतींच्या सभेसाठी गर्दी उसळली होती.
बसपाला केंद्र व राज्य शासनात निवडून दिल्यास फुले, शाहू, आंबेडकरांची किमान शंभर एकरांचे अनेक स्मारके तसेच संग्रहालये उभारली जातील, असे आश्वासन मायावती यांनी दिले. स्वतंत्र विदर्भ राज्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
वीस लाखांच्या व्यासपीठाचीच चर्चा मायावतींच्या सभेसाठी लाल किल्ल्याची प्रतिकृती असलेले व्यासपीठ उभारले होते व त्यासाठी तब्बल २० लाख रुपये खर्च करण्यात आले. मायावतींनी दिल्ली काबीज केली असून त्या लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करीत आहेत, असे भासविण्यासाठी लाल किल्ल्याच्या आकाराच्या व्यासपीठावर २० लाख रुपये खर्च करण्यात आले. नागपुरातील दिगंबर बागडे यांनी हे व्यासपीठ तयार केले होते. हे व्यासपीठ वॉटरप्रूफ होते. यासाठी दोन ट्रक थर्माकोलचा वापर करण्यात आला.