scorecardresearch

शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याच्या जागी आरक्षण 

महापौर बंगल्याची जागा किनारा नियमन क्षेत्रात (सीआरझेड) येते. तसेच हरित क्षेत्रात या जागेचा समावेश आहे.

Bal Thackeray memorial
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आरक्षित करण्यासाठी विकास योजनेत बदल करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे.

मुंबईतील दादर येथील महापौर बंगल्याची जागा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आरक्षित करण्यासाठी विकास योजनेत बदल करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. त्यासाठी बाधित होणाऱ्या व्यक्तींकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. मात्र केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल खात्याच्या मान्यतेनंतर आरक्षणातील फेरबदलाला अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे.

दादर चौपाटीला लागून असलेल्या महापौर बंगल्याच्या जागेवर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आहे. मुंबईच्या विकास योजनेत ही जागा महापौर बंगला यासाठीच आरक्षित आहे. स्मारकासाठी हे आरक्षण बदलणे आवश्यक आहे. या संदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने महापौर बंगल्याच्या १२ हजार ९२८ चौ.मी. जागेवर ठाकरे यांचे स्मारक उभारण्याची शिफारस केली आहे. त्याचबरोबर ही जागा ३० वर्षांच्या कालावधीसाठी भाडेपट्टय़ाने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक, या सार्वजनिक न्यासास देण्यास मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे. त्यानुसार महापौर बंगल्याचे आरक्षण बदल्याची प्रक्रिया सुरू  करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे.

महापौर बंगल्याचे आरक्षण उठवून, त्या जागी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी आरक्षण टाकल्यामुळे बाधित होणाऱ्या सर्व व्यक्तींनी एक महिन्याच्या आत हरकती व सूचना सादर कराव्यात, असे नगरविकास विभागाने सूचेनत म्हटले आहे.

महापौर बंगल्याची जागा किनारा नियमन क्षेत्रात (सीआरझेड) येते. तसेच हरित क्षेत्रात या जागेचा समावेश आहे. आता स्मारकासाठी हरित क्षेत्रातून ही जागा वगळून ती रहिवास क्षेत्रात समाविष्ट करण्यात येणार आहे. केंद्रीय पर्यावरण, वने व वातावरणीय बदल खात्याच्या मान्यतेनंतरच  अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-09-2017 at 05:25 IST

संबंधित बातम्या