मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांचे मत
मुंबई : ‘मेट्रो-३ प्रकल्पासाठी आरे परिसरात कारशेड उभारणे सर्वाधिक सोयीचे आहे. ही कारशेड अन्यत्र हलवावी लागली तर, हा प्रकल्पच पूर्ण होऊ शकणार नाही,’ अशी शक्यता मुंबई मेट्रो रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी व्यक्त केली. मुंबईत सार्वजनिक वाहतूक, मेट्रो आणि पर्यावरण याविषयी झालेल्या परिसंवादात त्या बोलत होत्या. कारशेडसाठी आरेऐवजी कांजूरमार्गचा प्रस्ताव पुढे केला जात असल्याच्या मुद्यावर त्यांनी हे मत व्यक्त केले.
‘मेट्रो-३’च्या कारशेडच्या उभारणीवरुन सध्या शहरातील वातावरण तापले आहे. कारशेडसाठी २,६४६ झाडे हटवावी लागणार आहेत. त्यास वृक्ष प्राधिकरणाने परवानगी दिली असली तरी पर्यावरणवाद्यांनी विरोध दर्शविला आहे. या पाश्र्वभूमीवर एसएनडीटी विद्यापीठाच्या उषा मित्तल इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे ‘मुंबई शहरातील सार्वजनिक वाहतूक, मेट्रो रेल्वे आणि पर्यावरण’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, पर्यावरणवादी डी. स्टॅलिन आणि झोरु बथेना, विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी हे उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थिनींसमोर मेट्रोमुळे मुंबईच्या वाहतुकीचे बदलणारे चित्र मांडताना अश्विनी भिडे यांनी मुंबई मेट्रोची गरज अधोरेखित केली. ‘आरेमधील जागा ही मेट्रो -३ च्या कारशेडसाठी सर्वात सोयीस्कर जागा असून, मेट्रोचे सर्व संचलन या ठिकाणी करणे शक्य आहे. कांजूरमार्गला मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय घेतला तरी आरे कॉलनीत छोटा कार डेपो करावा लागणार आहे. अन्यथा मेट्रो वाहतूक सुरळीत राहू शकणार नाही,’ असे त्या म्हणाल्या. कांजूरमार्गची जमीन मिळण्यात सरकारला अडचणी येत असून तेथे कारशेड उभारणे ही किचकट प्रक्रिया आहे. तसेच आरेमधील झाडे तोडल्यानंतर त्याबदल्यात २३ हजार ८४६ झाडे लावण्यात येतील, असे त्या म्हणाल्या.
कांजूरमार्गमधील काही जमीन सरकारी मालकीची असून त्यातील अल्पशी जमीन मेट्रोशेडसाठी आवश्यक असल्याचे मुद्दा स्टॅलिन यांनी यावेळी मांडला. ‘आरेमधील काही जमिनीवर झाडे नसल्याचे सरकार सांगत आहे, मात्र ही जागा पूरस्थितीत मिठी नदीतील अतिरीक्त पाण्याचा निचरा करण्यासाठी गरजेची आहे. या ठिकाणी कारशेड उभारुन काँक्रिटीकरण केल्यास नदीचे पाणी वसाहतींमध्ये पसरू शकते,’ असा दावा स्टॅलिन यांनी केला. मुंबईसाठी मेट्रो गरजेची आहेच याचा उल्लेख करत स्टॅलिन यांनी आमचा विरोध हा फक्त आरे कॉलनीत उभारण्यात येत असलेल्या मेट्रो कारशेडला आहे, असे सांगितले.
आरेतील जंगल नष्ट करून मेट्रो कारशेड उभारण्यासाठी थोडाच कालावधी लागणार आहे. मात्र येथील जैवविविधता अनेक वर्षांच्या प्रक्रीयेनंतर तयार झाली आहे. ती नष्ट करताना आपण त्याची नैसर्गिक किंमत लक्षात घेणार आहोत की फक्त आर्थिक बाजूनेच विचार करणार आहोत, असा प्रश्न झोरु बथेना यांनी उपस्थित केला.
मेट्रो गरजेचीच
‘शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हा शहराचा आत्मा आहे. त्यामुळे त्याच्या सक्षमीकरणासाठी मेट्रो गरजेची आहे. मेट्रोमुळे प्रदुषणाच्या पातळीत मोठी घट होणार असून तोडलेल्या झाडांपेक्षा अधिक प्रमाणात कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे,’ असे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सांगितले.