पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये पहिली मेट्रो ट्रेन मुंबईत

संपूर्णपणे जमिनीखालून धावणाऱ्या ‘मेट्रो ३’च्या डब्याचे पूर्णाकृती प्रारूपाचे (मॉक अप) मंगळवारी अनावरण करण्यात आले. मेट्रो ३ मार्गिकेला ‘अ‍ॅक्वा लाइन’ असे संबोधले जाणार असून या डब्यांची रंगसंगती तसेच संरचना या नावाला सुयोग्य अशी करण्यात आली आहे. डिसेंबरमध्ये डब्यांचे उत्पादन सुरू होणार असून नोव्हेंबर २०२० पर्यंत पहिली मेट्रो ट्रेन मुंबईत दाखल होईल.

ऑगस्टमध्ये ‘मेट्रो ३’च्या डब्याच्या प्रतिकृतीचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते. अ‍ॅलस्टॉम या फ्रेन्च कंपनीचे भारतीय भागिदार अ‍ॅलस्टॉम ट्रान्स्पोर्ट इंडिया यांनी या डब्याची संरचना विकसित केली असून उत्पादनाचे कामदेखील त्यांच्यामार्फतच करण्यात येणार आहे. अ‍ॅलस्टॉमच्या श्री सिटी, आंध्र प्रदेश येथील कारखान्यात निर्मितीचे काम होणार आहे. अ‍ॅलस्टॉमने मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या पाहणीसाठी मंगळवारी या डब्याचे अनावरण केले. सध्या ही पूर्णाकृती प्रारूप बंगळूरु येथे आहे.

‘मेट्रो ३’साठी आठ डब्यांच्या ३१ गाडय़ांच्या निर्मितीचे कंत्राट अ‍ॅलस्टॉमला देण्यात आले आहे. ही निर्मिती ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेच्या अंतर्गत होत आहे. एका डब्याची क्षमता सुमारे ३०० प्रवासी इतकी असून आठ डब्यांच्या एका ट्रेनमधून २४०० प्रवासी प्रवास करू शकतील.

डब्याचे वैशिष्टय़

  •  विनाचालक कार्यन्वयनासाठी सक्षम.
  •  अपंगासाठी व्हील चेअर ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था.
  •  सुखकर प्रवासासाठी अद्ययावत एअर सस्पेन्शनचा वापर.
  •  संपूर्ण वातानुकूलित, आद्र्रता नियंत्रण.
  •  प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा.
  •  आत्पकालिन प्रसंगी प्रवासी आणि वाहतूक नियंत्रकात संवादासाठी ‘ध्वनी संवाद’ यंत्रणा
  •  प्रत्येक डब्ब्यात अग्निशमन, धूर व अग्नी शोधक यंत्रणा