मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा वाहतूक सेवेत दाखल आहे. ही मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका असताना आणि या मेट्रोमुळे वातानुकुलित, अतिजलद प्रवास शक्य असतानाही या मार्गिकेला मुंबईकरांचा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळे आता उत्पन्नवाढीसाठी, खर्च भागविण्यासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनने (एमएमआरसी) एक नवीन पर्याय स्वीकारला आहे.
भुयारी मेट्रो स्थानके, कारशेड आणि मेट्रो गाड्या संचलनाची, गर्दीची वेळ वगळता इतर वेळात चित्रीकरणासाठी तसेच कार्यक्रमासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचे स्वतंत्र धोरण एमएमआरसीकडून आखण्यात आले आहे. या धोरणानुसार चित्रपट, लघुपट जाहिरातीच्या चित्रीकरणासह इतर कार्यक्रमासाठी गाड्या, कारशेड आणि स्थानकाचा परिसर भाड्याने दिला जाणार आहे. मेट्रो गाडीतील एका तासाच्या चित्रीकरणासाठी किंवा एक तास गाडी कार्यक्रमासाठी वापरण्यासाठी पाच लाख रुपये मोजावे लागणार आहेत.
एमएमआरसीकडून ३३.५ किमीच्या मेट्रो ३ मार्गिकेचे काम सध्या सुरु आहे. त्यातील आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. तर आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेड टप्पा २ अ चे काम सुरु असून हा टप्पा येत्या काही महिन्यात वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. भुयारी मेट्रो ३ मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होताना आरे ते बीकेसी टप्प्यावर दररोज चार लाख प्रवासी प्रवास करतील असा दावा करण्यात आला होता. मात्र दिवसाला २० हजार प्रवास प्रवास करत होते. आरे ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास या मार्गिकेवरुनही दिवसाला साडे सात लाख प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात दिवसाला या मार्गिकेवरुन अंदाजे ६० हजार नागरिक प्रवास करत आहेत. तिकीटातून उत्पन्न मिळत नसल्याने ही मार्गिका तोट्यात आहे. त्यामुळे खर्च भागविण्यासाठी, उत्पन्न वाढविण्यासाठी आता एमएमआरसीने मेट्रो गाड्या, मेट्रो स्थानक तसेच कारशेड चित्रपट, लघुपट, जाहिरातींच्या चित्रीकरणासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. तेथे कार्यक्रमही घेता येणार आहेत. त्याबाबतचे धोरण तयार करून ते प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती एमएमआरसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकसत्ताला दिली.
घाटकोपर-अंधेरी-वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेतील गाड्या, स्थानक, कारशेडचा परिसरही भाड्याने दिले जाते. त्याच धर्तीवर एमएमआरसीनेही आता गाड्या, स्थानक, कारशेड परिसर चित्रीकरण, कार्यक्रमासाठी भाड्याने देण्याचा निर्णय घेतला आहे. संचलन काळ संपल्यानंतर अर्थात मेट्रो सेवा कालावधी संपल्यानंतर चित्रीकरण, कार्यक्रमास परवानगी असणार आहे. त्यासाठी दरही निश्चित करण्यात आले आहेत. मेट्रो गाडीच्या तासाभराच्या वापरासाठी पाच लाख तर मेट्रो गाडी, स्थानक किंवा कारशेड एका तासासाठी वापरण्यासाठी साडेसात लाख रुपये मोजावे लागणार आहेत. पुढे तासाप्रमाणे दर वेगळे असतील. गाड्या, स्थानके, कारशेडच्या वापरासाठीच्या अटी-नियमही धोरणात नमूद करण्यात आले असून त्या अटींचे, नियमांचे पालन करणे संबंधित कंपन्यांना, संस्थांना बंधनकारक असणार आहे. हे धोरण एमएमआरसीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.