मुंबई…अंधेरी पश्चिम ते मंडाळ मेट्रो २ ब मार्गिकेतील डायमंड गार्डनर ते मंडाळे आणि दहिसर ते मिरा-भाईंदर-उत्तन मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव मार्गिकेच्या चाचण्या (ट्रायल रन) नुकत्याच सुरू झाल्या असून आता लवकरच आणखी एका मेट्रो मार्गिकेतील पहिल्या टप्प्याच्या चाचणीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरुवात केली जाणार आहे.
वडाळा-ठाणे-कासारवडवली मेट्रो ४ आणि कासारवडवली-गायमुख मेट्रो ४ अ मार्गिकेवरील कॅडबरी जंक्शन ते गायमुख दरम्यानच्या १०.५ किमी मार्गिकेवरील चाचणीला ऑगस्टमध्ये सुरुवात होणार आहे. चाचण्या यशस्वी करून सुरक्षा प्रमाणपत्र घेत ही मार्गिका डिसेंबर अखेरीस वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. ही मेट्रो वाहतूक सेवेत दाखल झाल्यास ठाणेकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
एमएमआरडीएकडून ३२.३२ किमी मेट्रो ४ आणि २.७ किमीच्या मेट्रो ४ अ मार्गिकेचे काम वेगात सुरु आहे. तर दुसरीकडे अन्यही मेट्रो मार्गिकांची कामे सुरु आहेत. अशात राज्य सरकारने येत्या वर्षभरात किमान ५० किमीचे मेट्रोचे जाळे पूर्ण करत या मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचे उद्दीष्ट एमएमआरडीएला दिले आहे. त्यानुसार एमएमआरडीएने निर्माणाधीन मेट्रो मार्गिकांच्या कामाला वेग देत टप्प्याटप्प्यात एक-एक मार्गिका पूर्ण करत त्या मार्गिकांचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन आखले आहे. त्याचाच भाग म्हणून एमएमआरडीएने मेट्रो २ ब मार्गिकेतील पहिल्या टप्प्यातील चाचण्यांना एप्रिलमध्ये सुरुवात झाली आहे.
तर मेट्रो ९ मार्गिकेतील दहिसर ते काशीगाव या पहिल्या टप्प्याच्या चाचण्यांना मागील आठवड्यात सुरुवात झाली असून आता चालू वर्षात आणखी एका मेट्रो मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात करण्याची तयारी एमएमआरडीएने सुरु केली आहे. त्यानुसार आॅगस्टमध्ये मेट्रो ४ आणि ४ अ मार्गिकेतील कॅडबरी जंक्शन ते गायमुख या पहिल्या टप्प्यातील मार्गिकेच्या चाचण्यांना सुरुवात होईल अशी माहिती महानगर आयुक्त डाॅ संजय मुखर्जी यांनी लोकसत्ताला दिली.
कॅडबरी जंक्शन ते गायमुख हा टप्पा एकूण १०.५ किमी असून त्यात दहा मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. कॅडबरी जंक्शन, माजीवाडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनीवाडी, डोंगरी पाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गोवनीवाडा आणि गायमुख अशी ही दहा मेट्रो स्थानके आहेत. या स्थानकांवरुन आॅगस्टमध्ये पहिल्यांदा मेट्रो धावेल. मेट्रोच्या चाचण्या सुरु झाल्यानंतर उर्वरित काम पूर्ण करून सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त करुन घेत कॅडबरी जंक्शन ते गायमुख असा पहिला टप्पा डिसेंबरअखेरपर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
दरम्यान मेट्रो ४ आणि मेट्रो ४ अचे कारशेड मोघरपाडा येथे प्रस्तावित असून अद्याप कारशेडच्या कामाला सुरुवात झालेली नाही. अशावेळी विना कारशेड ही मार्गिका कशी वाहतूक सेवेत दाखल होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर एमएमआरडीएने उपाय शोधला आहे. एमएमआरडीएकडून दोन स्टॅबलिंग लाईन म्हणजेच मेट्रो गाड्यांच्या देखभालीसाठी आणि त्यांची सुरक्षितपणे ठेवण्यासाठी वापरली जाणारी एक विशिष्ट मार्गिका तयार करण्यात येणार आहे. या स्टॅबलिंग लाईनचा वापर तात्पुरत्या स्वरुपात अर्थात कारशेड तयार होईपर्यंत केला जाणार असल्याचे एमएमआरडीएकडून सांगण्यात येत आहे.