दरवाढीच्या चर्चेमुळे सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या मुंबई मेट्रो-१च्या आगारासाठी आरक्षित असलेल्या जागेपैकी चार हेक्टर जागा सरकार व एमएमआरडीएतर्फेच विकासकांच्या हाती देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबई मेट्रोवन प्रा. लि. (एमएमओपीएल) आणि एमएमआरडीए यांच्यात झालेल्या सवलत करारपत्रानुसार डी. एन. नगर स्थानकानजीक मेट्रो आगारासाठी १३.८ हेक्टरची जागा राखीव ठेवण्यात आली होती. मात्र त्यापैकी फक्त ९.८ हेक्टर जागा आगारासाठी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच ही जागा दिलेल्या मुदतीपेक्षा एका वर्षांनंतर उपलब्ध करून दिल्याने प्रकल्पाची किंमतही वाढल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. पण एमएमआरडीएच्या मते आगारासाठी किती जागा उपलब्ध आहे, याबाबत मेट्रोला आगाऊ माहिती होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जुलै २००५च्या सरकारी आदेशानुसार मेट्रोच्या आगारासाठी १३.८ हेक्टर जागा राखीव ठेवण्यात आली होती. मेट्रोवन प्रकल्पासाठी निविदा भरणाऱ्या सर्वच निविदाकारांना तसे स्पष्ट सांगण्यात आले होते. ही जागा एमएमआरडीए ताब्यात घेऊन सप्टेंबर २००७मध्ये मुंबई मेट्रोवन प्रा. लि.कडे हस्तांतरित करणार होते. प्रत्यक्षात मुंबई मेट्रोवन प्रा. लि.ला या जागेचा ताबा मिळण्यास ऑगस्ट २००८ उजाडले. या एका वर्षांमुळे प्रकल्पाची किंमत वाढली.
प्रत्यक्षात १३.८ हेक्टरऐवजी फक्त ९.८ हेक्टर जागा ‘एमएमओपीएल’च्या ताब्यात आली. तसेच या आयताकृती जागेतील बरोबर मधली चार हेक्टर जागा विकासकांना देण्यात आली होती. या जागेची तत्कालिन किंमत ३००-४०० कोटींच्या आसपास होती, असे सूत्रांनी सांगितले. ‘एमएमओपीएल’ने आगाराचा आराखडा १३.८ हेक्टरच्या अंदाजाने तयार केला होता. मात्र प्रत्यक्षात अर्धगोलाकारातील ९.८ हेक्टर जागा मिळाल्यानंतर हा आराखडाही बदलावा लागला. त्यामुळेही प्रकल्पाची किंमत वाढल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
याबाबत मुंबई मेट्रोवन प्रा. लि.च्या प्रवक्त्यांशी संपर्क साधला असता, आगाराच्या बांधकामासाठी १३.८ हेक्टर जागेचे वचन दिले असताना प्रत्यक्षात मात्र ९.८ हेक्टर जागाच पुरवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आगाराच्या उभारणीत अनेक अडथळे आले. तसेच जगातील इतर मेट्रोंच्या आगारांच्या तुलनेत मुंबई मेट्रोवनचे आगार सर्वात छोटे आणि अडचणीचे आहे, असेही या प्रवक्त्यांनी सांगितले. मात्र, आगारासाठी आरक्षित जागेपैकी ९.८ हेक्टर जागाच उपलब्ध असल्याची माहिती ‘एमएमओपीएल’ला होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेट्रो व त्यांच्या आगारांचे क्षेत्र
मेट्रो प्रकल्प क्षेत्र
शास्त्री पार्क (दिल्ली) ५० हेक्टर
सरिता विहार (दिल्ली) ५० हेक्टर
हैदराबाद मेट्रो ८३ हेक्टर
मुंबई मेट्रोवन ९.८ हेक्टर

आगारासाठी ताब्यात घेतलेली जागा खासगी असल्याने सरकारी धोरणानुसार त्यातील २५ टक्के जागा खासगी विकासकांना देण्यात आली आहे.
-यूपीएस मदान, आयुक्त,
एमएमआरडीए

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Metro carshed in developers hand
First published on: 20-07-2015 at 06:58 IST