उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या गर्दीने सदैव खच्चून भरलेले दादर स्थानक गेल्या आठवडय़ापासून काहीसा मोकळा श्वास घेत आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवासी मार्गाची अदलाबदल करण्यासाठी दादर स्थानकाचा वापर करत असल्याने या स्थानकात सदैव तुडुंब गर्दी असते. मात्र मेट्रो सुरू झाल्यापासून अंधेरी व घाटकोपरकडे जाणारे प्रवासी मेट्रोचाच वापर करत असल्याने दादर स्थानकातील प्रवाशांची संख्या दीड ते दोन लाखांनी घटल्याचा अंदाज रेल्वेतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. मात्र यामुळे रेल्वेच्या उत्पन्नावर फारसा परिणाम झाला नसल्याचेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रोवन प्रकल्पामुळे घाटकोपर ते अंधेरी प्रवासासाठी लागणारा पाऊण तासाचा वेळ फक्त २० मिनिटांवर आल्याने प्रवाशांनी पहिल्या आठवडय़ातच मेट्रोला भरभरून पसंती दिली. बसमार्गावरील गर्दीपाठोपाठ आता दादर स्थानकातील प्रवाशांची संख्याही घटल्याने रेल्वे सेवेला पर्याय म्हणून मेट्रो यशस्वी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या आठवडाभरात दादर स्थानकातील गर्दी तब्बल दीड ते दोन लाखांनी कमी झाल्याचा अंदाज मध्य रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत. पश्चिम रेल्वेवरही दादर स्थानकात उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे, असे पश्चिम रेल्वे जनसंपर्क अधिकारी शरत् चंद्रायन म्हणाले.
दादर स्थानकातील गर्दी कमी झाली असली, तरी अंधेरी आणि घाटकोपर या दोन्ही स्थानकांवर सध्या गर्दी पाहायला मिळत आहे. अंधेरी स्थानकात मेट्रोच्या दृष्टीने योग्य बदल केल्याने येथे प्रवाशांना फार अडचण येत नाही. मात्र जागेच्या अभावी घाटकोपर स्थानकात फार फेरफार शक्य नसल्याने घाटकोपर येथे मात्र प्रवाशांना त्रास होत आहे.