जोगेश्वरी वसाहत दुर्घटनेप्रकरणी स्थानिकांची लोकप्रतिनिधींवर आगपाखड; आठवडय़ाभरात बैठक घेण्याचे मंत्र्यांचे आश्वासन

जोगेश्वरीतील नव्या म्हाडा पोलीस वसाहतीमध्ये गुरुवारी इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्घटना घडली. रहिवाशांनी तक्रारी करूनदेखील म्हाडाकडून इमारत दुरुस्त न केल्याच्या तक्रारींचा पाढा या घटनेची पाहणी करण्यास आलेल्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांकडे वाचला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या मंत्र्यांना या समस्या सोडवण्यासाठी येत्या आठवडाभरात अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊ, असे आश्वासन द्यावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जोगेश्वरी पूर्वेकडे पूनमनगर येथे म्हाडाची नवी पोलीस वसाहत आहे. या वसाहतीत पोलिसांची अनेक कुटुंबे वास्तव्याला आहेत. या वसाहतीतील एका इमारतीच्या तळमजल्यावरील घराच्या बाल्कनीचा भाग गुरुवारी कोसळला. या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. इमारतीच्या अन्य घरांमधील भिंतींना, बाल्कनीला तसेच छताला तडे गेले आहेत. इमारतीची लिफ्टही बंद आहे. ही इमारत ३० वर्षे जुनी असून तिची एकदाच दुरुस्ती करण्यात आली आहे. या इमारतीची दुरुस्ती करण्यात यावी तसेच या वसाहतींतील सदनिका येथे राहणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना कायमस्वरूपी देण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री तसेच म्हाडाकडे केली होती. मात्र याबाबतचा निर्णय गृहविभागाकडून होणे अपेक्षित असल्याचे उत्तर म्हाडाने दिले होते. वारंवार दुरुस्तीचे अर्ज म्हाडाला करूनदेखील दुरुस्ती करण्यात आलेली नसतानाच या इमारतीचा काही भाग कोसळला. त्यामुळे येथील रहिवाशी संतप्त झाले असून त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींवर आगपाखड केली.  शुक्रवारी हा भाग कोसळल्याची पाहणी करण्यास पोहचलेले राज्याचे गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र  वायकर यांच्याकडे स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त करत येथील इमारतींच्या दुरवस्थेचा पाढाच वाचला. त्यामुळे स्थानिक आमदार असलेले हे मंत्री महोदय खडबडून जागे झाले व यातून मार्ग काढण्यासाठी पुढील आठवडय़ात अधिकाऱ्यांसमवेत बठक घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.