‘अपात्र’ झोपडीधारकांचा असहकार; सारे काही आलबेल असल्याचा मुख्याधिकाऱ्यांचा दावा
धारावी सेक्टर पाचचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी शासनाकडून ‘म्हाडा’कडे सोपवण्यात आली खरी, परंतु ‘म्हाडा’ला हे पुनर्वसन कार्य डोईजड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इथल्या पुनर्वसनग्रस्तांसाठी बांधलेल्या इमारतीत घरे देण्यासाठी काही जण पात्र तर काही अपात्र ठरले आहेत. अपात्र झोपडीधारक अपीलात गेले असून ते म्हाडाच्या अधिकाऱ्यांना झोपडय़ा ताब्यात घेण्यासाठी विरोध करू लागल्याने म्हाडाला त्यांची घरे ताब्यात घेणे मुश्किल झाल्याचे दिसून येत आहे.
‘म्हाडा’ने धारावी सेक्टर पाचमध्ये मनोहर जोशी महाविद्यालयाच्या मागे ३५८ सदनिकांची एक १८ मजली इमारत पुनर्सवसनग्रस्तांसाठी बांधून पूर्ण केली आहे. महत्प्रयासाने बांधून झालेल्या या इमारतीसमोरील शताब्दी नगरमधील झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांच्या घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात एकूण २३४ जणांना अपात्र ठरवण्यात आले. तर, २६६ लोकांना पात्र ठरवण्यात आले. मात्र, या अपात्र झोपडीधारकांनी म्हाडा विरोधात एल्गार पुकारला असून ते सध्या अपीलात गेले आहेत.
हे अपात्र झोपडीधारक इतक्यावरच थांबले नसून पात्र झोपडीधारकांच्या झोपडय़ा सील करण्यासाठी गेलेल्या म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांना या अपात्र सदस्यांनी हुसकावून लावले आहे. तसेच या नागरिकांनी म्हाडाच्या मुख्यालयावर १३ मे रोजी एक मोर्चाही काढला होता. त्यामुळे सर्वच पात्र झोपडीधारकांची घरे म्हाडाला ताब्यात घेता न आल्याचे सूत्रांकडून समजते आहे. अपात्र लोकांचा निर्णय होईपर्यंत झोपडय़ा तोडू नयेत आणि पात्र-अपात्रतेच्या निकषांवर फेरविचार केला जावा अशा प्रमुख मागण्या असल्याचे येथील माजी आमदार बाबूराव माने यांनी सांगितले. त्यामुळे एकंदरीतच ही इमारत मेहतीने बांधल्यानंतर आता म्हाडापुढे नव्या अडचणी येऊन थबकल्या आहेत. तसेच धारावीच्या पहिल्या चार सेक्टरच्या विकासासाठी धारावी पुनर्वसन प्राधीकरणारन मध्यंतरी आंतरराष्ट्रीय स्तरावर निविदा काढली होती. मात्र, याला कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नव्याने काही अटी शिथील करून ही निविदा पुन्हा काढण्याचे सरकारच्या मनात आहे. त्यामुळे धारावी विकासाचे शुक्लकाष्ठ म्हाडा व शासनाच्या मागे लागल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, याचा म्हाडातर्फे इन्कार करण्यात आला असून म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे म्हणाले, या इमारतीत पात्र ठरलेल्यांना चाव्यांचे वाटप करण्यात आले असून अपात्र हे अपीलात गेले आहेत.
कोणावरही अन्याय होऊ नये ही म्हाडाची भूमिका असून येथील नागरिकांनी आम्हांला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada face difficulty in dharavi sector five rehabilitation
First published on: 24-05-2016 at 05:35 IST