scorecardresearch

गिरणी कामगार घर सोडत – २०२० : बॉम्बे डाईंग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील पात्र विजेत्यांना लवकरच घरांचा ताबा

म्हाडाच्या मुंबई मंडळाने १ मार्च २०२० रोजी गिरणी कामगारांसाठी काढलेल्या ३८९४ घरांच्या सोडतीमधील पात्र विजेत्यांची घराची प्रतीक्षा आता अखेर संपणार आहे.

गिरणी कामगार घर सोडत – २०२० : बॉम्बे डाईंग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलमधील पात्र विजेत्यांना लवकरच घरांचा ताबा
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने १ मार्च २०२० रोजी गिरणी कामगारांसाठी काढलेल्या ३८९४ घरांच्या सोडतीमधील पात्र विजेत्यांची घराची प्रतीक्षा आता अखेर संपणार आहे. बाॅम्बे डाईंग, स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलच्या आवारात बांधण्यात आलेल्या सर्व इमारतींना निवासाचा दाखला मिळाला असून आता पात्र विजेत्यांकडून घरांची संपूर्ण रक्कम भरून घेऊन त्यांना घराचा ताबा देण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

गिरणी कामगारांसाठी बाॅम्बे डाईंग, बाॅम्बे डाईंग स्प्रिंग मिल आणि श्रीनिवास मिलमध्ये उभारण्यात आलेल्या ३,८९४ घरांसाठी २०२० मध्ये सोडत काढण्यात आली होती. मात्र ही सोडत काही कारणांमुळे वादात अडकली. उच्च न्यायालयाच्या सनियंत्रक समितीने सोडतीला स्थगिती दिली. परिणामी, पात्रता निश्चिती आणि घराचा ताबा प्रक्रिया लाबंणीवर गेली. ताबा देण्यास विलंब होण्याची शक्यता पाहता मुंबई मंडळाने सनियंत्रक समितीकडे पात्रता निश्चिती सुरू करण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर पात्रता निश्चिती सुरू केली. दरम्यान, एक हजारांहून अधिक विजेत्यांची पात्रात निश्चिती झाल्यानंतर देकार पत्र पाठवून घराची रक्कम भरून घेण्यात येणार आहे. त्यानंतर घराचा ताबा देण्यासाठी मंडळाने समितीकडे परवानगी मागितली. ही परवानगीही मिळाली आणि तात्पुरते देकार पत्र देण्यास मंडळाने सुरुवात केली. असे असले तरीही अद्याप पात्र विजेत्यांना घरांचा ताबा मिळालेला नाही.

हेही वाचा – मुंबई : रखडलेल्या ३८ प्रकल्पांबाबत म्हाडाकडे कृती योजनेचा अभाव

सनियंत्रक समितीने स्थगिती उठवली, पण निवासी दाखला न मिळाल्याने घरांचा ताबा प्रक्रिया मंडळाला सुरू करता येत नव्हती. आता या इमारतींना निवासी दाखला मिळाला असून घरांचा ताबा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे पात्र विजेत्यांकडून घराची संपूर्ण रक्कम भरून घेऊन लवकरच ताबा देण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. घराचा ताबा मिळणार असल्याने विजेत्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब असणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 17:13 IST

संबंधित बातम्या