उत्पन्न गटांच्या फेररचनेची ग्वाही ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष सतीश गवई यांनी दिली होती. त्यानुसार आता उत्पन्न गटांची फेररचना करण्यात आली असून अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेली उत्पन्न मर्यादा आठ हजार रुपयांवरून दरमहा १६ हजार रुपयांपर्यंत नेण्यात आली असून उच्च उत्पन्न गटातील घर मिळवण्यासाठी मासिक उत्पन्न ७० हजार रुपयांपेक्षा अधिक असावे लागणार आहे. ‘म्हाडा’च्या घरांच्या किमती आणि उत्पन्न गटाचा ताळेमळ बहुतांश वेळा साधला जात नाही. ही विसंगती सर्वसामान्यांना घरांपासून दूर ठेवून दलालांना प्रोत्साहन देण्यासाठी तर नाही ना अशी शंकाही वारंवार व्यक्त केली जात होती. त्यामुळे यावर्षी मे महिन्यात झालेल्या सोडतीवेळी दिवाळीपूर्वी ‘म्हाडा’च्या घरांसाठी असणाऱ्या उत्पन्न मर्यादेच्या अटींची फेररचना केली जाईल, असे सतीश गवई यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मागील प्राधिकरण बैठकीतच हा विषय चर्चेला येणार होता, पण त्यावर निर्णय झाला नाही. गुरुवारी प्राधिकरणाची बैठक झाली. त्यात नवीन उत्पन्न गटांच्या रचनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
सध्या अत्यल्प उत्पन्न गटासाठी दरमहा आठ हजार रुपये, अल्प उत्पन्न गटासाठी ८००१ ते २० हजार रुपये, मध्यम उत्पन्न गटासाठी २०००१ ते ४० हजार रुपये आणि उच्च उत्पन्न गट ४० हजारच्या पुढे अशी ‘म्हाडा’च्या उत्पन्न गटाची रचना आहे.
आता अत्यल्प उत्पन्न गटाची मर्यादा दरमहा १६ हजार रुपये झाली आहे, तर अल्प उत्पन्न गटासाठी १६,००१ ते ४० हजार रुपये आणि मध्यम उत्पन्न गटासाठी ४०,००१ ते ७० हजार रुपये आणि उच्च उत्पन्न गटासाठी ७०,००१ रुपयांपेक्षा अधिक अशी नवीन उत्पन्न गटाची रचना करण्यात आली आहे.
इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने ताब्यात घेतलेली जमीन चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक असल्यास त्याचा पुनर्विकास म्हाडातर्फेच करण्यात येईल, असाही निर्णय प्राधिकरण बैठकीत घेण्यात आला आहे.
नवीन उत्पन्न गट
उत्पन्न गट दरमहा उत्पन्न
अत्यल्प उत्पन्न गट १६ हजार रुपयांपर्यंत
अल्प उत्पन्न गट १६,००१ ते ४० हजार रुपये
मध्यम उत्पन्न गट ४०,००१ ते ७० हजार रुपये
उच्च उत्पन्न गट ७०,००१ रुपयांपेक्षा अधिक
अत्यल्प गटाची मर्यादा आठवरून १६ हजारांवर
‘म्हाडा’च्या घरांसाठी पैसे भरण्यासाठीची तब्बल १८० दिवसांची वाढीव मुदत देण्यास प्राधिकरणाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. यामुळे यशस्वी अर्जदारांना एक प्रकारे दिलासा मिळाला असला तरी या मुदतीत पैसे न भरल्यास अर्जदाराला मिळालेले घर रद्द होणार असून प्रतीक्षा यादीतील अर्जदाराला ते मिळणार आहे. त्यामुळे म्हाडाच्या घरांसाठी पैसे भरण्यासाठी आधीपासूनच अर्जदारांना तयारी ठेवावी लागणार आहे. ‘म्हाडा’च्या घराच्या किमतीच्या २५ टक्के रक्कम भरण्यासाठी एक महिन्याची, तर बाकीची ७५ टक्के रक्कम भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत आहे. शिवाय ते न जमल्यास १३.७ टक्के व्याजासहित पैसे भरण्यासाठी ४५ दिवसांची अतिरिक्त मुदत होती. आता ही अतिरिक्त मुदत १८० दिवस करण्यात आली आहे. पैसे भरण्यासाठीची मुदत वाढवून देत अर्जदारांना दिलासा दिल्यानंतर त्यापुढे मात्र पैसे भरले नाहीत, घरावर पाणी सोडण्याची वेळ यशस्वी अर्जदारांवर येणार आहे.