मुंबई : राज्यातील ॲप आधारित बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांना राज्यात व्यवसाय करताना कायद्याचे पालन करावेच लागेल. खासगी वाहतूक व्यवसाय करणाऱ्या बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांनी नियमांचे उल्लघंन केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
विधान भवन येथे ॲप आधारित बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सीच्या विविध विषयासंदर्भात बैठकीत प्रताप सरनाईक बोलत होते. यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांच्यासह परिवहन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्य शासन नेहमीच या क्षेत्रात होणाऱ्या सकारात्मक बदलांसाठी नाविन्यपूर्ण उपक्रमांना पाठबळ देत आले आहे. कोणत्याही ॲप आधारित बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांनी कायदेशीर बाबींचे पालन करूनच वाहतूक व्यवसाय करावा. राज्य शासनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येईल. ॲपवर आधारित बस, मोटारगाडी, बाइक टॅक्सी यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना, तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. शासनाचे नियम प्रवाशांच्या हिताचे असून त्यांच्या हिताचे संरक्षण होणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.