मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात आलेली एमएचटी सीईटी परीक्षा २७ एप्रिल रोजी संपली. या परीक्षेदरम्यान काही प्रश्नपत्रिकेतील उत्तरांचे पर्याय चुकीचे असल्याचे उघडकीस आले. रविवारी झालेल्या परीक्षेत जवळपास २० पेक्षा अधिक प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना प्रश्न, पर्याय यांबाबत आक्षेप आहेत, त्यांना तेमे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नोंदवता येणार आहेत.

अभियांत्रिकी, कृषी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी एचएचटी सीईटी परीक्षा दोन टप्प्यांत घेता येते. त्यानुसार यंदा पहिल्या टप्प्यात कृषी आणि औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र म्हणजेच पीसीबी गटाची परीक्षा ९ ते १७ एप्रिलदरम्यान झाली. या परीक्षेसाठी देशभरातून ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील २ लाख ८२ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ९३.९१ टक्के इतके होते. दुसऱ्या टप्प्यात अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी भौतिकशस्त्र, रसायनशास्त्र आणि गणित म्हणजेच पीसीएम या गटासाठी १९ ते २७ एप्रिल दरम्यान परीक्षा झाली. पीसीएम गटासाठी ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली आहे. त्यातील ४ लाख २५ हजार ५४८ उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रमाण ९१. ६६ टक्के इतके होते. पीसीबी गटाची परीक्षा १६८ तर पीसीएम गटाची परीक्षा १९७ केंद्रांवर झाली. दोन्ही टप्प्यात झालेल्या या परीक्षांदरम्यान अनेक विद्यार्थ्यांना काही प्रश्नांबाबत शंका उपस्थित झाल्या. तसेच अखेरच्या दिवशी झालेल्या परीक्षेवेळी जवळपास २५ प्रश्नांसाठी देण्यात आलेल्या पर्यायी उत्तरे ही चुकीची असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात आला होता. याची दखल घेत विद्यार्थ्यांना पुढील १० दिवसांमध्ये म्हणजेच मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका व उत्तरे लॉगिन आयडीवर उपलब्ध करून देण्यात येतील. त्यानुसार विद्यार्थ्यांना आक्षेप नोंदविण्याची संधी देण्यात येणार आहे. या कालावधीत आक्षेप नोंदविण्यात येणाऱ्या प्रश्नांबाबत राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून नियुक्त केलेल्या समितीकडून पडताळणी करून पुढील निर्णय घेण्यात येईल, असे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आक्षेप योग्य असल्यास पैसे परत मिळणार

आक्षेप नोंदविण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून प्रत्येक प्रश्नासाठी ठरावीक शुल्क आकारण्यात येते. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्यांला अधिक प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याला त्या प्रमाणात शुल्क भरावे लागणार आहे. मात्र विद्यार्थ्यांनी प्रश्नांसदर्भात नोंदविलेला आक्षेप योग्य असल्यास संबंधित प्रश्नासाठी आकारलेले शुल्क हे विद्यार्थ्याला परत करण्यात येते, अशी माहितीही राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.