बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांची चौकशी सुरू असतानाच, आता त्यांचा स्वीय सहाय्यक (पीए) असलेले मिलिंद कदम याला लाचलुचपत विभागाने ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली आहे.
राज्य सरकारच्या विधी व न्याय विभागात कायदेशीर सल्लागार या पदावर कार्यरत असलेल्या मिलिंद कदम याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रात्री उशिरा अटक केली. कदम याने नोटरी म्हणून नेमणूक करण्यासाठी एका वकिलाकडून साडेतीन लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी ४५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली.
वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे राहणाऱ्या एका वकिलाने सरकारच्या २००९मध्ये आलेल्या जाहिराती पाहून ‘नोटरी’साठी अर्ज केला होता. नोटरीचे अधिकार मिळाल्यावर स्टँप पेपर विकणे, नोटरी करणे आदी गोष्टींचा अधिकार व्यक्तीला मिळतो. जानेवारी २०१५मध्ये त्याची मुलाखतही झाली होती. या मुलाखतीत त्याची निवड झाली असली, तरी त्यावर शिक्कामोर्तब होणे बाकी होते. त्या वेळी मंत्रालयातील विधी व न्याय विभागात कायदेशीर सल्लागार असलेल्या मिलिंद कदम या अधिकाऱ्याने ‘तुझे काम लवकर करून देतो,’ असे सांगून त्याच्याकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली.
या वकिलाला पाच लाख रुपये लाचेपोटी देणे जड असल्याने अखेर साडेतीन लाख रुपयांवर सौदा पक्का झाला. दरम्यान, वकिलाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास कदम याला या वकिलाकडून ४५ हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना पकडले. जीपीओजवळ ही कारवाई करण्यात आल्याचे विभागाचे पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांनी सांगितले.