मुंबईतील १२ गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास तातडीने सुरुवात करावी, मृत कामगारांच्या वारसाहक्काचा प्रश्न सोडवण्यासाठी तोडगा काढावा आणि गेल्या वर्षी ‘म्हाडा’तर्फे कामगारांसाठी काढण्यात आलेल्या ६९२५ घरांच्या सोडतीमधील सर्व घरांचे वाटप १४ ऑगस्टपर्यंत करावे, या मागण्यांसाठी गिरणी कामगारांचा आज, शुक्रवारी  मोर्चा निघणार आहे.
गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी गेल्या वर्षी २८ जून रोजी ‘म्हाडा’ची सोडत निघाली. त्यातील ३०० कामगारांना घराचा प्रत्यक्ष ताबा मिळाला. उर्वरित गिरणी कामगारांना ताबा देण्याची प्रक्रिया सुरू असली तरी ती कधी पूर्ण होणार याची ‘म्हाडा’कडे योजना नाही. घरांच्या वाटपाची प्रक्रिया अशीच सुरू राहिली तर पुढील पाच वर्षांतही ती पूर्ण होणार नाही, अशी टीका गिरणी कामगार संघटनांनी केली आहे. सरकारकडे १२ गिरण्यांची जमीन उपलब्ध आहे. तरीही या जमिनीवर गिरणी कामगारांसाठी घरे बांधण्यास सुरुवात झालेली नाही. सरकार त्यात विलंब करत आहे. तर खटाव मिल आणि बॉम्बे डाईंग मिलच्या मालकांनी अद्यापही जमीन सरकारकडे जमा केलेली नाही. सरकारने आता हस्तक्षेप करून ती जमीन तातडीने ताब्यात घ्यावी, अशी मागणी गिरणी कामगारांची आहे. आझाद मैदानावर सकाळी ११ वाजता गिरणी कामगार एकत्र येणार आहेत. ‘म्हाडा’च्या कार्यालयासमोरही निदर्शने करण्यात येणार आहेत.