घरे विकण्यासाठी तगादा; ‘म्हाडा’कडील माहिती दलालांपर्यंत पोहोचलीच कशी?
मुंबईत घरे मिळवण्यासाठी रक्ताचे पाणी-पाणी केलेल्या गिरणी कामगारांना घरे मिळाल्यानंतरही सुखाचे चार क्षण अनुभवण्यासाठीही त्रास सहन करावा लागत आहे. या कामगारांसाठी घरांची दुसरी सोडत निघून तीन महिने होत नाहीत तोच काही दलालांनी त्यांच्या घरांचा सौदा करण्यासाठी त्यांना त्रास देण्यास सुरूवात केली आहे. या सोडतीत पात्र ठरलेल्या कामगारांचे फोन क्रमांक, पत्ते आदी इत्थंभूत माहिती या दलालांच्या हातील लागल्याने ‘म्हाडा’कडे असलेली ही माहिती दलालांपर्यंत पोहचली कशी? हा सवाल उपस्थित होत आहे.
मुंबईतील गिरणी कामगारांना घरे देण्यासाठी आजवर घरांच्या दोन सोडती काढण्यात आल्या आहेत. त्यातील पहिली सोडत २८ जून २०१२ ला झाली असून दुसरी सोडत यंदा ९ मे २०१६ ला झाली आहे. मात्र, २०१२ साली काही गिरणी कामगारांना घरे मिळाल्यानंतर जो त्रास सुरू झाला त्याचीच पुनरावृत्ती यंदाच्या सोडती नंतरही होत आहे. विजेत्या झालेल्या गिरणी कामगारांच्या पात्रतेबाबतची प्रक्रिया सुरू असतानाच त्यांना आता काही दलाल घरांच्या विक्रीसाठी सतावू लागले आहेत. या दलालांकडे विजेत्या गिरणी कामगारांचे फोन क्रमांक, पत्ते आदी संपूर्ण माहिती असून तुम्हांला मिळालेली कागदपत्रे व ‘म्हाडा’ची पावती आम्हांस द्या, आम्ही सर्व प्रक्रिया करून घर ताब्यात घेऊन तुम्हांला त्याचा मोबदला देतो. असे सांगून आमिष दाखवत आहेत. तसेच, या दलालांना विचारणा केली असता आम्हांला ‘म्हाडा’च्या कार्यालयातूनच तुमचा पत्ता व फोन क्रमांक मिळाला आहे, अशी उत्तरे दलाल कामगारांना देतात. सोडतीत लागेलली घरे दहा वर्षे विकता येत नाहीत, तरीही असे दलाल कामगारांना घरे विकण्यासाठी भरीस पाडत आहेत. त्यामुळे गिरणी कामगार कृती संघटना आक्रमक झाली असून त्यांनी ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांना पत्र देऊन याप्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली. बाळकृष्ण काजिरे, उदयकुमार कोंडेकर, काशिनाथ पाटील,तानाजी सावंत, काशिराम राणीम, सुरेश सरवणकर, शामसुंदर मुळ्ये आदी सेंच्युरी मिल व प्रकाश कॉटन, भारत टेक्सटाईल आदी गिरण्यांमधील कामगारांना हे दलाल गाठून हैराण करत असल्याचे गिरणी कामगार कृती संघटेनेने स्पष्ट केले. २०१२ सालच्या पहिल्याच सोडतीनंतर देखील असे प्रकार झाले असून यंदा देखील असे प्रकार झाल्याने ‘म्हाडा’च्या कारभारविषयी संभ्रम निर्माण होत आहे.
दरम्यान, गिरणी कामगारांनी याप्रकरणी आम्हांला तक्रार द्यावी आम्ही संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार देऊ, असे ‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाचे उप-मुख्याधिकारी चंद्रकांत डांगे यांनी स्पष्ट केले.

पत्ते दिले कोणी?
सोडतीत यशस्वी झालेल्या कामगारांची यादी ‘म्हाडा’ने इंटरनेटवर प्रसिद्ध केली होती. त्यात केवळ कामगारांची नावेच असून त्यात पत्ते नाहीत. विजेत्या गिरणी कामगारांचे पत्ते हे केवळ ‘म्हाडा’कडेच आहेत. त्यामुळे दलालांना पत्ते दिले कोणी? हा प्रश्न उपस्थित होत आहे. दलालही पत्ते व फोन क्रमांक ‘म्हाडा’कडूनच मिळाल्याचे सांगत असल्याने याप्रकरणी ‘म्हाडा’ने तात्काळा चौकशी करावी.
– दत्ता इस्वलकर, अध्यक्ष, गिरणी कामगार कृती संघटना