मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रात प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर पथकर नाक्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून इंधनाचा अपव्यय होत आहे. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. त्यामुळे दहिसर पथकर नाका तेथून पुढे दोन किमी अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीतील हा पथकर नाका शहराच्या आत असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी हा पथकर नाका दोन किमी अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर हलवावा. यामुळे मीरा-भाईंदर व मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुलभ होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

यासंदर्भात सरनाईक म्हणाले की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यातील अनेक पथकर नाके रद्द केले. तसेच सर्व पथकर नाक्यावरील लहान वाहनांना पथकर माफ केला. या निर्णयाचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले. दहिसर पथकर नाक्यामुळे मीरा भाईंदर शहरातील १५ लाख स्थानिक नागरिक, वाहनचालक, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

यामुळे प्रवासाचा वेळ वाढत असून इंधनाचा अपव्यय होत आहे. त्यामुळे मागणी मान्य झाल्यास, स्थानिक नागरिकांना पथकरमुक्त प्रवासाचा लाभ मिळेल आणि वाहतुकीवरील ताण कमी होईल, असा विश्वास परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान, दहिसर पथकर नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा या विषयावर लवकरच बैठक घेऊन प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरनाईक यांना दिली.

प्रवाशांचे म्हणणे काय ?

गर्दीच्या वेळी दहिसरहून अंधेरीला पोहोचण्यासाठी सुमारे दोन ते तीन तास लागतात. दहिसर येथील पथकर नाका बंद झाल्यास प्रवास करण्यास सोयीस्कर होईल.

विद्यार्थी, पालकांना दिलासा

शालेय बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने, अनेक पालक विद्यार्थ्यांसाठी अनाधिकृत वाहनांचा पर्याय निवडत आहेत. परंतु, आता परिवहन विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय व्हॅनच्या परवान्यांचे वाटप खुले केले आहे. याबाबतची अधिसूचना जारी होणार आहे, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली. तर, अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत शालेय व्हॅन सुरू करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरले आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.