अमेरिकी नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मीरा रोड भागातील कॉल सेंटरचा मुख्य सूत्रधार सागर ठक्करला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली. सागर ठक्कर उर्फ शॅगी याला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट १ ने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले. मीरा रोड परिसरातील हरिओम आय.टी.पार्क, युनिवर्सल आऊट सोर्सिंग सर्व्हिसेस आणि ओसवाल हाऊस या तीन ठिकाणी हे कॉलसेंटर चालविण्यात येत होते. या तिन्ही बोगस कॉलसेंटरच्या माध्यमातून अमेरिकी नागरिकांना आयआरएस विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करत त्यांची आर्थिक फसवणूक करत असल्याची बाब ठाणे पोलिसांच्या कारवाईतून उघड झाली होती. या कारवाईत ७२ जणांना अटक करण्यात आली होती. बोगस कॉल सेंटर्सच्या माध्यमातून तब्बल ६ हजार ४०० अमेरिकन नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. गेल्यावर्षी ४ ऑक्टोबरला रात्री पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. ठाणे गुन्हे शाखेच्या २०० पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

पेणकरपाडा येथील या एकाच इमारतीत तब्बल सात कॉल सेंटर चालवली जात होती. परदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक या कॉल सेंटरमधून केली जात होती. या कॉलसेंटरमध्ये जवळपास पाचशेच्या आसपास कर्मचारी काम करीत होते. पोलिसांनी या सर्व कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले. अधिकारी वर्ग वगळता यातील बहुतांश कर्मचारी २० ते २२ या वयोगटांतील आहेत. कामाच्या पद्धतीनुसार त्यांना ११,००० ते २०,००० इतके वेतन दिले जायचे. बारावी पास आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व ही पात्रता आवश्यक असल्याने शिक्षण अर्धवट सोडलेले आणि शिक्षण करून कामधंदा करू इच्छिणाऱ्या तरुणांनी या ठिकाणी नोकरी पत्करली. मुलाखती झाल्यानंतर त्यांना प्रशिक्षण दिले जायचे. अमेरिकी इंग्रजी कसे बोलायचे, परदेशी नागरिकांशी कसा संवाद साधायचा याचे धडे दिले जायचे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांमार्फत अमेरिकी नागरिकांना फोन करून इन्श्योरन्स पॉलिसी विक्री, सरेंडर करुन रक्कम परत देण्याचे आमिष दाखवत पैसे गोळा करत असत किंवा बँक अकाऊंटची माहिती मिळवून पैसे लंपास केले जात असत. अनेक कॉल सेंटरवरुन इन्कम टॅक्स गोळा करण्याची धमकी देऊन पैशांची वसुलीही केली जायची.