काही ठरावीक विषयांना भासणारी पूर्णवेळ प्राध्यापकांची कमतरता यामुळे पेपर सेटर्सनी घालून ठेवलेल्या गोंधळामुळे गेले काही दिवस मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा गाजत आहेत. कधी प्रश्नपत्रिकेत चुका राहून जातात तर कधी एखादा प्रश्नच निसटतो, कधी जादा गुणांची प्रश्नपत्रिका हाती पडते तर कधी भलत्याच विषयाची. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दरम्यान मनस्ताप देणाऱ्या घटनांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे परीक्षा विभागाचे पेपर सेटर्स जबाबदार असल्याचे लक्षात येते.
त्या त्या विषयाचे प्राध्यापकच प्रश्नपत्रिका लिहिण्याचे व उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करतात. पण, पुरेसे व अनुभवी शिक्षक उपलब्ध होत नसल्याने विद्यापीठाला आहेत त्या अनुनभवी व मर्यादित शिक्षकांवर काम भागवावे लागते आहे. परिणामी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका तपासणीच्या कामात कमालीचा ढिसाळपणा आढळून येतो. अपवाद वगळता हे प्रकार काही ठराविक विषयांच्या बाबतीतच होत आहेत. कारण, हे बहुतांश अभ्यासक्रम विनाअनुदानित तत्त्वावर चालणारे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत, की ज्यांचा बहुतेक कारभार बाहेरून आमंत्रित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या जोरावर चालतो.
उदाहरणार्थ एलएलबीला दरवर्षी साधारणपणे १० ते १२ हजार विद्यार्थी बसतात. या विद्यार्थ्यांकरिता विधी विषयाचे किमान ३० पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध असायला हवेत. पण, परीक्षा विभागाला सध्या केवळ १० ते १२ शिक्षकांच्या मदतीने काम भागवावे लागते आहे.
प्राध्यापकांच्या कमतरतेचा हाच फटका उत्तरपत्रिका मूल्यांकनालाही बसतो. उत्तरपत्रिका तपासणीतला हा ढिसाळपणा पुनर्मूल्यांकनाच्या निकालांमधून स्पष्ट होतो. कारण, पुनर्मूल्यांकनात काही ठरावीक विषयांमध्ये गुण वाढण्याचे अथवा कमी होण्याचे प्रमाण जास्त आहे.
याबाबत परीक्षा नियंत्रक दीपक वसावे यांनी सांगितले की, प्रश्नपत्रिका सदोष असतील तर ती पेपर सेटर्सची चूक आहे. कारण, त्यांनी तयार केलेल्या प्रश्नपत्रिका आम्हाला पाहता येत नाही. प्राध्यापकांनी मात्र या गोंधळाला परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार ठरविला.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2013 रोजी प्रकाशित
परीक्षेदरम्यान होणाऱ्या चुका प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे
काही ठरावीक विषयांना भासणारी पूर्णवेळ प्राध्यापकांची कमतरता यामुळे पेपर सेटर्सनी घालून ठेवलेल्या गोंधळामुळे गेले काही दिवस मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा गाजत आहेत. कधी प्रश्नपत्रिकेत चुका राहून जातात तर कधी एखादा प्रश्नच निसटतो, कधी जादा गुणांची प्रश्नपत्रिका हाती पडते तर कधी भलत्याच विषयाची.
First published on: 02-05-2013 at 04:41 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mistakes while examination due to teachers shortage