‘वॉचडॉग फाऊंडेशन’च्या सर्वेक्षणातील निरीक्षण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिठी नदीला येऊन मिळणाऱ्या सहा प्रमुख नाल्यांमुळे मिठी नदीच्या प्रदूषणात भर पडत असल्याचे निरीक्षण ‘वॉचडॉग फाऊंडेशन’ने नोंदविले आहे.

मिठी नदीला पश्चिम उपनगरात सहा मोठे नाले येऊन मिळतात. या नाल्यांलगत असणारी वस्ती आणि औद्योगिक  कंपन्यांमधून नाल्यामंध्ये टाकला जाणारा जैविक कचरा व प्रक्रिया न केलेल्या सांडपाण्यामुळे नदीचे पात्र प्रदूषित होत असल्याचा दावा फाऊंडेशनने केला आहे. याशिवाय ‘नॅशनल वॉटर मॉनेटरिंग प्रोजेक्ट’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या मिठी नदीच्या पाण्याच्या गुणवत्ता तपासणीत, नदी मोठय़ा प्रमाणात प्रदूषित होत असल्याची माहिती फाऊंडेशनला माहितीच्या अधिकाराखाली मिळाली आहे.

मिठी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याकरिता मिठी नदी विकास प्राधिकरण व प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वारंवार होणाऱ्या उपाययोजनात्मक बाबी निष्फळ ठरत असल्याचे पुन्हा समोर आले आहे.

१५ किलोमीटर लांबीची मिठी नदी पवईमधील विहार तलावामधून उगम पावत कुर्ला, साकीनाका, कलिना आणि वाकोला मार्गे अरबी समुद्राला माहीमच्या खाडीत येऊन मिळते. या मार्गात ‘के-पूर्व’ विभागातील श्रद्धानंद, लेलेवाडी, ओबेरॉय व कृष्णनगर नाला आणि ‘एल’ विभागातील जरीमरी नाला आणि ‘एच-पूर्व’ विभागातील वाकोला नाला हे नाले मिठी नदीच्या मुख्य प्रवाहाला येऊन मिळतात. या नाल्यांलगत असणाऱ्या वस्त्यांमधून मोठय़ा प्रमाणात घनकचरा आणि सांडपाणी सोडले जात असल्याने, मिठीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे फाऊंडेशनने केलेल्या पाहणीत दिसून आले. याशिवाय ‘नॅशनल वॉटर मॉनिटरिंग प्रोजेक्ट’अंतर्गत करण्यात आलेल्या तपासणीत नदीत ‘बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड’ व ‘केमिकल ऑक्सिजन डिमांड’ मर्यादित प्रमाणापेक्षा धोकादायक स्तरापर्यंत वाढल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून माहितीच्या अधिकाराखाली देण्यात आली.

नाल्यांमुळे होणारा प्रदूषणाचा अहवाल फाऊंडेशनने मिठी नदी विकास प्राधिकरण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मुंबई पालिकेला पाठविला आहे.

नाल्यांशेजारी असणाऱ्या औद्यागिक कंपन्यांमधून प्रक्रिया न केलेले रसायनयुक्त पाणी नदीच्या पात्रात परवानगीशिवाय सोडले जात असल्याचे निरीक्षण नोंदवले गेले आहे. यामुळे नदी अधिक प्रदूषित होत असल्याचे फाऊंडेशनचे गॉडफ्री पेमेंटा यांनी सांगितले. मरोळ औद्योगिक संकुलातील सिमेंट व मार्बल कंपनी, नंदधाम उद्योग, मित्तल उद्योग वसाहत, ‘एल’ विभागात असणाऱ्या रसायन व पावडर कोटिंग उद्योग व वाहन दुरुस्ती केंद्रे यांसारख्या औद्योगिक वसाहतींमुळे नदी प्रदूषणात भर पडल्याचे ते म्हणाले.

घातक रसायनांचा प्रवाह

मिठीभोवती उभारलेल्या उद्योग वसाहतींमधून विषारी घातक रसायने नदी पात्रात मिसळत असल्याने त्याचा परिणाम शेजारील मानवी वस्तींच्या आरोग्यासोबतच निर्सगावर आणि अप्रत्यक्षरीत्या जमिनीअंतर्गत असणाऱ्या पाण्याच्या साठय़ावर होत असल्याचेही पेमेंटा यांनी सांगितले. याविषयी प्रतिक्रियेसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mithi river polluted due to six drains
First published on: 24-10-2017 at 02:04 IST