मुंबई : ईशान्य भारतातील मिझोरम हे पर्वतीय राज्य. घनदाट जंगल, डोंगराळ भाग, शुद्ध हवा, आल्हाददायक आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. आतापर्यंत मिझोरमला जाण्यासाठी असुरक्षित रस्तेमार्गाने किंवा मर्यादित विमान सेवेने प्रवास करावा लागत होता. परंतु, तब्बल २६ वर्षांनी भारतीय रेल्वे मिझोरमशी जोडली गेली असून आता पर्यटकांना रेल्वेने थेट मिझोरम गाठता येणार आहे. तसेच, जेएनपीटीवरून मिझोरमध्ये मालाची वाहतूक करणेही सहज शक्य होणार आहे.
मिझोरम हे ‘टेकड्यांवरील लोकांची भूमी’ म्हणून ओळखली जाती. मि म्हणजे माणूस आणि झो म्हणजे डोंगराळ प्रदेश. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या नागरिकांना उद्देशून मिझोरम असे नाव पडले. मिझोरमला आसाम, मणिपूर आणि त्रिपुरा या राज्यांची सीमा लागून आहे. तसेच बांगलादेश आणि म्यानमार या देशांचीही सीमा लागून आहे. मिझोरम उंच डोंगर, घनदाट जंगल आणि जैवविविधतेने परिपूर्ण आहे. परंतु, येथे जीवनावश्यक आणि अत्यावश्यक सामानाची वाहतूक करणे खूप खर्चिक आणि वेळखाऊ आहे. त्यामुळेच मिझोरममध्ये धोकादायक रस्त्यावरून अवजड वाहन चालवणे कठीण असून इंधन खर्च व इतर खर्चामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढतात.
आता बैराबी-सैरांग ५१.३८ किमी नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प तयार केल्याने, मिझोरमची राजधानी ऐझाॅलला थेट रेल्वे जोडणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे रस्ते मार्गावरील मालवाहतुकीचा भार रेल्वे मार्गावर विभाजित होईल. कमी खर्चात, कमी वेळेत आणि सुरक्षितपणे जीवनाश्यक सामानाची वाहतूक केली जाईल. तसेच प्रवासी रेल्वेगाड्या सुरू झाल्याने, पर्यटकांना गुवाहाटीवरून थेट रेल्वेने मिझोरम गाठता येईल. परिणामी, कमी खर्चात मिझोरमचा दौरा करता येणार आहे.
बैरागी ते सैरांग रेल्वे प्रकल्प
– एकूण लांबी ५१.३८ किमी
– अंदाजे खर्च ८,०७१ कोटी रुपये
– १२,८५३ मीटर लांबीचे ४८ बोगदे
– ५५ प्रमुख पूल- ८७ लहान पूल
– ५ उड्डाणपूल- ६ रोड ओव्हर ब्रिज
– ११४ मीटर सर्वात उंच पूल
मिझोरममध्ये वंदे भारत, अमृत भारतही धावणार
मिझोरममधील रेल्वेमार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. लवकरच प्रवाशांसाठी मिझोरमची राजधानी ऐझाॅल येथून रेल्वे सुरू होईल. तसेच या ठिकाणी विद्युतीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे डिसेंबर २०२५ किंवा जानेवारी २०२६ पर्यंत या मार्गावरून वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत धावतील. गुवाहाटीवरून ऐझाॅलला येण्यासाठी रस्तेमार्गे किंवा हवाई मार्ग उपलब्ध होता. वाहनाने येण्यासाठी साधारणपणे एक ते दोन हजार रुपये खर्च येतो. तर, गुवाहाटी ते ऐझाॅल दरम्यान कमी विमाने असल्याने हवाई प्रवासावर मर्यादा येतात. यासह अनेकांना विमान प्रवास परवडणारा नसतो. त्यामुळे रेल्वे मार्ग सुरू झाल्याने शयनयान डब्यातून सुमारे ४०० ते ५०० रुपयांत प्रवाशांचा सुरक्षित आणि आरामदायी प्रवास होईल.- कपिंजल किशोर शर्मा, मुख्य जनसंपर्क अधिकारी, ईशान्य सीमावर्ती रेल्वे.