मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे चैत्यभूमी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यास गेले नाहीत तसेच महापरिनिर्वाणदिनाच्या तयारीसाठी त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून स्वतः बैठकही घेतली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यास उद्धव ठाकरे यांना वेळ नाही व त्यांचे बाबासाहेबांविषयीचे प्रेम बेगडी आहे, हे स्पष्ट झाल्यामुळे राज्यातील जनतेत आक्रोश आहे. आता किमान महापरिनिर्वाणदिनाला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास जातील, अशी आपल्याला आशा आहे, असं मत भाजपाचे विधान परिषदेतील प्रतोद आ. भाई गिरकर यांनी व्यक्त केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना अभिवादन करण्यासाठी देश विदेशातून लाखो लोक येतात. त्यांच्या व्यवस्थेसाठी गेली पाच वर्षे स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठक आयोजित करत होते. देवेंद्र फडणवीस महापरिनिर्वाणदिनाला सकाळीच अभिवादन करण्यास उपस्थित राहत. त्यांच्या पुढाकाराने राज्यपालांनी त्यांच्यासोबत महापरिनिर्वाणदिनी अभिवादनाला येण्याची परंपरा सुरू झाली, असं गिरकर यावेळी म्हणाले. फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले होते. या पार्श्वभूमीवर यंदाच्या महापरिनिर्वाणदिनाच्या तयारीसाठी मंगळवारी मुंबईत उच्चस्तरीय बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला केवळ मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. आपण स्वतः या बैठकीस उपस्थित होतो. मुख्यमंत्र्यांसह प्रमुख मंत्री बैठकीस उपस्थित राहतील, असे आपल्याला सांगण्यात आले होते, असंही ते म्हणाले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे १९७८ मध्ये चैत्यभूमी येथे अभिवादन करण्यास गेले होते व त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील कोणीही चैत्यभूमीवर अभिवादनास गेलेले नाही. किमान राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर तरी उद्धव ठाकरे चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना मानवंदना देण्यास जातील, अशी अपेक्षा होती पण त्यांना त्यासाठी वेळ मिळालेला नाही. चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाणदिनाला लाखोंचा समुदाय जमा होतो. त्यांच्या व्यवस्थेसाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनीच पुढाकार घेण्याची गेल्या पाच वर्षांची परंपरा आहे. पण उद्धव ठाकरे मात्र बैठकीस गैरहजर राहिले, असंही ते म्हणाले. मुंबईत आल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी चैत्यभूमी येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बहुतेक मंत्र्यांना मात्र शपथविधीनंतर त्यासाठी वेळ मिळालेला नाही, याची खंत वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla bhai girkar criticize cm uddhav thackeray bharatratna dr babasaheb ambedkar chaityabhumi jud
First published on: 05-12-2019 at 09:13 IST