मुंबई : ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरील घाटकोपर – अंधेरीदरम्यान धावणारी शटल सेवा मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) सोमवारपासून बंद केली आहे. मात्र त्याच वेळी ‘मेट्रो १’च्या घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो मार्गिकेवरील गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ‘मेट्रो १’वर सोमवारपासून प्रतिदिन आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या असून आता एकूण फेऱ्यांची संख्या ४४४ वरून ४५२ झाली आहे.
मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अशी ओळख असलेली ‘घाटकोपर – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिका २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली. या मार्गिकेस सुरुवातीस प्रवाशांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र आता मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळत असून ‘मेट्रो १’मधून प्रतिदिन पाच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत आहेत. प्रवासी वाढत असताना मेट्रो गाड्यांच्या डब्यांच्या संख्येत मात्र वाढ झालेली नाही. या मार्गिकेवरून आजही चार डब्यांची मेट्रो गाडी धावत आहे. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी कार्यालयीन वेळेत मेट्रो गाड्यांमध्ये प्रवांशांची प्रचंड गर्दी होते.
घाटकोपर – अंधेरीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर एमएमओपीएलने घाटकोपर – अंधेरी दरम्यान शटल सेवा सुरू केली होती. ही शटल सेवा जेमतेम दोन महिने सुरू होती. सोमवारपासून ही शटल सेवा बंद करण्यात आली. शटल सेवा सुरू करूनही कार्यालयीन वेळेतील गर्दी कमी होत नसल्याचे निदर्शनास आले असून त्यामुळे शटल सेवा बंद करण्यात आल्याची माहिती एमएमओपीएलमधील सूत्रांनी दिली.
घाटकोपर – अंधेरी शटल सेवा बंद करतानाच गर्दीला सामावून घेण्यासाठी एमएमओपीएलने ‘मेट्रो १’ मार्गिकेवरील मेट्रो गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. घाटकोपर – वर्सोवादरम्यान सोमवारपासून आठ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दिवसाला ४४४ मेट्रो गाड्यांच्या फेऱ्या धावत होत्या. आता या फेऱ्यांची संख्या ४५२ वर गेली आहे. ‘मेट्रो १’ मार्गिकेवर दर ३ मिनिटे आणि २५ सेकंदाने एक गाडी सुटत होती. आता मात्र दर ३ मिनिटे २० सेकेंदाने गाडी धावणार आहे. एकूणच गाड्यांची संख्या वाढल्याने आता प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.