मुंबई : मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनच्या (एमएमआरसी) ‘आणिक आगार, वडाळा – गेटवे ऑफ इंडिया भुयारी मेट्रो ११’ मार्गिकेचे संरेखन, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव मूल्यांकन अभ्यास पूर्ण करण्यात आला आहे. हा अहवाल एमएमआरसीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून नागरिकांनी या अहवालावर २० ऑगस्टपर्यंत सूचना-हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन एमएमआरसीकडून करण्यात आले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ३३७ किमीच्या लांबीच्या मेट्रो प्रकल्पातील ‘मेट्रो ११’ची उभारणी एमएमआरसीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या १७.५१ किमी लांबीच्या, संपूर्णत भुयारी मार्गिकेचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. एकूण १४ स्थानकांचा समावेश असलेली ही मार्गिका आणिक आगार, वडाळा ट्रक टर्मिनल, सीजीएस वसाहत, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, हे बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, महात्मा ज्योतिबा फुले मंडई, हाॅर्निमन सर्कल आणि गेटवे ऑफ इंडिया या भागातून जाणार आहे. या मार्गिकेचे संरेखन निश्चित करण्यात आले आहे. तसेच पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव मूल्यांकन अभ्यास पूर्ण करून अहवालही सादर करण्यात आला आहे. हा अहवाल एमएमआरसीच्या संकेतस्थळावरील https://corporate.mmrcl,com/corporate/pages/projects-reports-dcouments या लिंकवर सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

नागरिकांनी या अहवालवर आपल्या सूचना – हरकती २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत townplanningassist@mmecl.com या ई – मेल आयडीवर पाठवाव्यात, असे आवाहन एमएमआरसीकडून करण्यात आले आहे. त्याचबरोबर वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरसीच्या मुख्यालयात संचालक, नियोजन व रिअल इस्टेट विकास यांच्याकडेही सूचना-हरकती सादर करता येणार आहेत. या सूचना-हरकती सादर झाल्यानंतर त्यावर सार्वजनिक सुनावणी घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान. मेट्रो मार्गिकेचे संरेखन, पर्यावरणीय आणि सामाजिक प्रभाव मूल्यांकन अहवाल मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय, एमएमआरसीचे मुख्यालय, मुंबई बंदर प्राधिकरण कार्यालय येथे कार्यालयीन वेळेत पाहण्यासाठी, वाचण्यासाठी उपलब्ध होईल, असेही एमएमआरसीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रहिवासी, पर्यावरण संघटना, प्रकल्पग्रस्त, स्थानिक नागरिकांना आता २० ऑगस्टपर्यंत आपल्या सूचना-हरकती नोंदविणे आवश्यक आहे.