मुंबईच्या वाहतूक स्थितीत आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पांची स्वप्ने दाखवणाऱ्या ‘एमएमआरडीए’ने चक्क जागतिक बँकेलाही गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्याच्या (एससीएलआर) मूळ आराखडय़ात उभारणीदरम्यान प्रचंड फेरफार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. भारतातील पहिला डबलडेकर उड्डाणपूल असलेल्या या रस्त्याची रुंदी एमएमआरडीएने प्रत्यक्ष बांधकामादरम्यान कमी केली असून, त्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे आढळले आहे. याबाबत सिटिझन ट्रान्सपोर्ट कमिटीचे सदस्य जितेंद्र गुप्ता यांनी काढलेल्या माहितीनुसार जागतिक बँकेसमोर सादर केलेल्या या प्रकल्पाचा प्रस्ताव आणि प्रत्यक्षात उतरलेला रस्ता यात तफावत असल्याचे आढळले आहे.
एमएमआरडीएने जागतिक बँकेकडे सादर केलेल्या प्रस्तावात या रस्त्याची रुंदी ४५.७ मीटर असेल, असे म्हटले होते. मात्र हा मार्ग बांधताना कपाडियानगर, लालबहादूर शास्त्री मार्गाजवळील परिसर येथील अनेक दुकाने, घरे यांचे विस्थापन करणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रत्यक्षात उतरलेल्या या मार्गाची रुंदी प्रस्तावित रुंदीपेक्षा सात मीटरने कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी एका अर्थी हा मार्ग बांधताना जागतिक बँकेची फसवणूक झाल्याचे स्पष्ट होत आहे. कपाडियानगर परिसरात अनेक दुकाने आहेत, तसेच या परिसरात वस्तीही आहे. ही जागा ताब्यात घेऊन तेथे रस्ता रुंद करणे आवश्यक होते. मात्र तसे घडलेले नाही. या ठिकाणी असलेली अनेक दुकाने अनधिकृत असल्याचेही स्पष्ट होत आहे. मात्र ही दुकाने हटवून त्यांना दुसरीकडे जागा देण्यास प्रशासन अपयशी ठरले आहे. परिणामी येथे रस्त्यासाठी असलेली दोन्ही बाजूंची प्रत्येकी ३.३५ मीटर एवढी जागा वाया गेली आहे. यामुळे अंदाजे सात मीटर जागा सांताक्रूझ-चेंबूर जोडरस्त्यासाठी वापरता आली नाही. त्यामुळे जागतिक बँकेसमोर सादर केलेला प्रस्ताव आणि प्रत्यक्षात उतरलेले काम यात प्रचंड तफावत आहे. याबाबत एमएमआरडीए प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jun 2014 रोजी प्रकाशित
‘एमएमआरडीए’चा जागतिक बँकेला गंडा
मुंबईच्या वाहतूक स्थितीत आमूलाग्र बदल घडवण्याची क्षमता असलेल्या प्रकल्पांची स्वप्ने दाखवणाऱ्या ‘एमएमआरडीए’ने चक्क जागतिक बँकेलाही गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे.

First published on: 03-06-2014 at 02:17 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mmrda cheated the world bank