मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वांद्रे-कुर्ला संकुल येथे बांधलेली ९.९० किमी लांबीची सायकल मार्गिका वापराविना धूळ खात पडली होती. त्यातच बीकेसीतील अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस जटील बनत आहे. त्यामुळे ही सायकल मार्गिका तोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला असून काही दिवसांपासून सायकल मार्गिका तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. सायकल मार्गिका पूर्णपणे तोडून रस्त्यांची रुंदी वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच बीकेसीतील अंतर्गत ९.९० किमी लांबीचे रस्ते रुंद होणार असून यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
बीकेसीत प्रवास करणाऱ्या नागरिकांना पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्थेचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी सहा कोटी रुपये खर्च करीत एमएमआरडीएने सायकल मार्गिका उभारली. मार्गिकेचे थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. मात्र या सायकल मार्गिकेचा वापर वाहनतळ म्हणून होऊ लागला. सायकल मार्गिकेचा वापरच होत नसल्याने या प्रकल्पावर टीका होऊ लागली. असे असतानाही २०१७ मध्ये पुन्हा सायकल मार्गिकेचा घाट घालण्यात आला.
५ किमी लांबीची आणि त्यानंतर पुढे दोन टप्प्यात आणखी काही लांबीची सायकल मार्गिका बांधण्यात आली. या सायकल मार्गिकेसाठी ५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र या मार्गिकेचा वापरच होत नसल्याने एमएमआरडीएवर टीका होऊ लागली होती. अखेर काही महिन्यांपूर्वी एमएमआरडीएने ही सायकल मार्गिका उखडून रस्त्यांची रुंदी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार काही दिवसांपूर्वी सायकल मार्गिका तोडण्याच्या कामाला एमएमआरडीएने सुरुवात केल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सायकल मार्गिका उभारण्यासाठी एमएमआरडीएने ५५ कोटी आणि या प्रकल्पाच्या नियोजनावरही काही कोटी रुपये खर्च केले. इतके कोटी रुपये खर्च करून आता सायकल मार्गिका तोडून रस्त्यांची रुंदी वाढविण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सध्याची सायकल मार्गिका दोन पदरी असून रूंदीकरणानंतर हे रस्ते तीन पदरी होणार आहेत. रस्त्यांची रुंदी वाढल्यास बीकेसीतील अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. बीकेसीतील प्रवासाच्या वेळेत १० ते १५ मिनिटांची बचत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सायकल मार्गिका तोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. रस्ते रुंदीकरण शक्य तितक्या लवकर पूर्ण करून तीन पदरी रस्ते वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.