मुंबई: दहिसर ते गुंदवली मेट्रो ७ आणि दहिसर ते अंधेरी मेट्रो २ अ मार्गिकेवरील तिकीट दरात भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गिकेवरील तिकीट दरांच्या निश्चितीसाठी वा तिकीट दरांतील सुधारणेसाठी दर निर्धारण समिती नेमण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. ही समिती स्थापन झाल्यास येत्या दीड-दोन वर्षात मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
मेट्रो २ अ आणि ७ मार्गिका मागील दोन वर्षांपासून वाहतूक सेवेत दाखल आहेत. या दोन्ही मार्गिकांचे संचलन महामुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून (एमएमएमओसीएल) केले जाते. या मार्गिकांना आता चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. सुकर, सुरक्षित आणि अतिजलद प्रवासामुळे मेट्रोला हळूहळू पसंती मिळू लागली आहे. रेल्वेच्या तुलनेत मेट्रोचे तिकीट दर अधिक असले तरी जलद आणि सुकर प्रवासामुळे मुंबईकरांचा या दोन्ही मेट्रो मार्गिकांना वाढता प्रतिसाद आहे. मात्र तरीही मार्गिकेवरील अपेक्षित प्रवासी संख्येचे उद्दीष्ट गाठण्यात एमएमआरडीएला अद्यापही यश आलेले नाही. आजच्या घडीला या मार्गिकेवरुन दिवसाला अंदाजे दोन लाख ७० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. अपेक्षित प्रवासी संख्या यापेक्षा अधिक असल्याने एमएमआरडीएला अपेक्षित महसूल मिळताना दिसत नाही. अपेक्षित महसूल मिळत नसल्याने तोटा भरुन काढण्यासाठी एमएमआरडीएकडून भविष्यात दोन्ही मार्गिकांच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने एमएमआरडीएने पाऊल उचलले आहे. मेट्रो ७ आणि २ अ साठी दर निर्धारण समिती नेमण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविला आहे. महानगर आयुक्त डाॅ संजय मुखर्जी यांनी यास दुजोरा दिला आहे.
मेट्रो रेल्वे (ऑपरेशन आणि मेंटेनन्स) कायदा, २००२ च्या अध्याय ७ मधील ‘भाडे निर्धारण’ अंतर्गत असलेल्या कलम ३३ आणि ३४ (१) अंतर्गत भाडे निर्धारण समिती (एफएफसी) स्थापन करण्यासाठी एमएमआरडीएकडून प्रस्ताव देण्यात आला आहे. संचलन आणि देखभाल कायद्यानुसार अनुपालन आवश्यकतेच्या पूर्ततेसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. भाडे निश्चिती किंवा त्यात सुधारणा करण्यासाठी हा प्रस्ताव नाही, असे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे, असे असले तरी दर निश्चिती आणि त्यात सुधारणा करण्याचे अधिकार या समितीकडे असतात. त्यामुळे भविष्यात दीड-दोन वर्षात या दोन्ही मार्गिकांच्या तिकीट दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.