मुंबई : सुमारे २१ हजार २०० कोटी रुपये खर्चाच्या आणि २२ किलोमीटर लांबीच्या बहुचर्चित ‘शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू’वरून एकेरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना तब्बल ५०० रुपये तर मोठया वाहनांना ८०० पासून तीन हजार रुपयांपर्यंत पथकर (टोल) भरावा लागण्याची शक्यता आहे. यावर आज, गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. अन्य महामार्गाच्या तुलनेत हा दर कमी असल्याचा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे.
हेही वाचा >>> ‘मुंबई-गोवा महामार्गाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा, अन्यथा अवमान कारवाई होणार’ उच्च न्यायालयाचे निर्देश
मुंबईतून कोकण किंवा पश्चिम महाराष्ट्रात सुखकारक प्रवासासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या पुलाची उभारणी केली असून या प्रकल्पाची किंमत आता २१ हजार २०० कोटींवर गेली आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून लवकरच हा सागरी सेतू वाहतुकीसाठी खुला होणार आहे. प्रकल्पावर झालेला खर्च वसूल करण्यासाठी सुमारे ३० वर्षांसाठी पथकर आकारण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला असून त्यासाठी नवी मुंबईतील उलवेजवळ शिवाजीनगर आणि चिर्ले (गव्हाण) या दोन ठिकाणी पथकर नाके उभारण्यात येणार आहेत. सेतूवरुन एकेरी प्रवासासाठी हलक्या वाहनांना ५०० रुपये पथकर भरावा लागू शकतो. वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनांकरीता परतीचे पास (एकेरी पथकराच्या दीडपट), दैनिक पास (एकेरी पथकराच्या अडीचपट) आणि मासिक पास (एकेरी पथकराच्या पन्नास पट) देण्यात येणार आहेत. या मार्गावरील पथकराचा दर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील पथकरांपेक्षा कमी असल्याचा दावा प्राधिकरणाने केला आहे. पथकर वसुलीबाबतचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारला पाठविण्यात आला असून त्यावर लवकरच मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा सूत्रांनी व्यक्त केली.
प्रस्तावित पथकर
हलकी वाहने – ५०० रु.
मिनीबस – ८०० रु.
बस, ट्रक – १,६६० रु.
एमएव्ही – १,८१० रु.
अवजड वाहने – २,६०० रु.
अतिअवजड वाहने – ३,१६० रु.