महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ठाणे शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सोमवारी अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या असून त्यामध्ये विभाग अध्यक्ष पद खालसा करून त्याऐवजी प्रभाग समिती स्तरावर शहर कार्यकारणी सदस्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पदे रद्द झालेले विभाग अध्यक्ष आणि शहर कार्यकारणी यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचण्याची चिन्हे आहेत. तसेच या नव्या नियुक्त्यांमध्ये विधानसभा क्षेत्रनुसार पदांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेकांची पदे गेल्याने या निवड प्रक्रियेला नाराजीची किनार असल्याचे दिसत आहे. या नियुक्त्यांनंतर नाराजानी स्वतंत्र बैठक घेऊन त्यामध्ये वेगळा गट तयार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे मनसेतील गटा-तटाचे राजकारण पुन्हा रंगण्याची चिन्हे आहेत.  
ठाणे शहर सचिव, शहर सहसचिव, शहर कार्यकारणी सदस्य, उपविभाग अध्यक्ष व शाखाध्यक्ष, आदी पदांच्या नियुक्त्या सोमवारी संपर्क अध्यक्ष गिरीश धानुरकर आणि शहराध्यक्ष निलेश चव्हाण यांनी जाहीर केल्या. मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून कामाचा आढावा घेतला होता. त्यानुसार, या नियुक्त्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाराज पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आलेले नाही तसेच कोणत्याही नाराजांची बोळवण केलेली नाही,  असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. या नियुक्त्या वर्षभरासाठी करण्यात आल्या असून त्यांचा वार्षिक कामाचा अहवाल पाहून त्यांना पुढे मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
असे असले तरी मनसेच्या नव्या नियुक्त्यांवरून शहर कार्यकारणीसह नव्या नियुक्त्यांमध्ये डावलण्यात आलेल्या विभाग अध्यक्षांचा संषर्घ सुरूच आहे. ‘नाराजांनी’ नियुक्त्या जाहीर झाल्यानंतर स्वतंत्र बैठक घेऊन त्यामध्ये चर्चा केली. मात्र, या चर्चेबद्दल अधिक तपशील मिळू शकला नाही.
मध्यंतरी, या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मनसेचे आमदार प्रविण दरेकर यांच्यासमोरही या पदाधिकाऱ्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. या नव्या नियुक्त्यांमध्ये विभाग अध्यक्ष पद खालसा करण्यात आल्याने २० जणांची पदे गेली आहेत.